23 February 2019

News Flash

आठवडय़ातून एक दिवस पाणीबंद?

पावसाने ओढ घेतल्याने मुंबईकरांना पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये पाण्याची भर पडत नसल्याने मुंबईत १० टक्के पाणीकपात लागू करण्याच्या निर्णयापर्यंत पालिकेच्या जल विभागातील अधिकारी आले आहेत.

| August 26, 2015 03:13 am

पावसाने ओढ घेतल्याने मुंबईकरांना पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये पाण्याची भर पडत नसल्याने मुंबईत १० टक्के पाणीकपात लागू करण्याच्या निर्णयापर्यंत पालिकेच्या जल विभागातील अधिकारी आले आहेत. मात्र त्यामुळे पाण्याची फारशी बचत होत नसल्याचे लक्षात आल्यामुळे प्रत्येक विभागातील पाणी पुरवठा आठवडय़ातून एक दिवस बंद ठेवण्याचा विचार काही अधिकारी करीत आहेत. त्यामुळे नेमक्या किती पाण्याची बचत झाली याचा हिशेब लागेल आणि पाण्याच्या उधळपट्टीला लगामही बसेल. पण कायम मतपेटीवर डोळे ठेवणाऱ्या राजकारण्यांकडून होणाऱ्या संभाव्य विरोधामुळे या पर्यायाची अंमलबजावणी कशी करायची असा प्रश्न अधिकाऱ्यांना पडला आहे.पालिकेकडून मुंबईकरांना दररोज ३,७५० दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा केला जातो. गेले काही दिवस पावसाचा लपंडाव सुरू झाला असून त्यामुळे तलावपातळीत फारशी वाढ होऊ शकलेली नाही. उलटपक्षी  दररोज मुंबईकरांसाठी तलावातील ३,७५० दशलक्ष लिटर पाणी उचलण्यात येत आहे. १ ऑक्टोबर रोजी तलावांमध्ये १४ लाख दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध असल्यास पुढील जून-जुलैपर्यंत मुंबईकरांना सुरळीत आणि मुबलक पाणीपुरवठा करणे पालिकेला शक्य आहे. सध्या सुमारे १० लाख दशलक्ष लिटरच्या आसपास पाणी तलावात आहे. सप्टेंबरमध्ये समाधानकारक पाऊस पडला नाही तर पाणीपुरवठय़ाची स्थिती गंभीर बनू शकते. त्यामुळे आतापासूनच १० टक्के पाणीकपात करून मुंबईकरांच्या पाण्याचे नियोजन करण्याचा निर्णय अधिकाऱ्यांनी केला आहे. त्याची घोषणा बुधवारी होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रामधील काही शहरांमध्ये पाणीटंचाईचे संकट कायम भेडसावत असते. त्यामुळे या शहरांमधील प्रत्येक विभागात आठवडय़ातून एक दिवस पाणीपुरवठा बंद करण्यात येतो. त्यामुळे किती पाण्याची बचत झाली हे लक्षात येते आणि त्याच्या आधारे पाणीपुरवठय़ाचे वेळापत्रकही आखता येते. पाण्याची चणचण असल्यामुळे आणि तेथील नागरिक सुजाण असल्यामुळे या पर्यायाला फारसा विरोध होत नाही. मुंबईमध्ये मोठय़ा प्रमाणावर पाण्याचा अपव्यय केला जातो.  झोपडपट्टय़ांमधून होणाऱ्या पाण्याच्या बेसुमार चोरीला आळा बसविणेही पालिकेला शक्य झालेले नाही. जीर्ण जलवाहिन्या बदलून पाणी गळतीवर मलमपट्टी करण्याचे प्रयत्न पालिकेकडून सुरू आहेत. पण त्यातही संथगती आहे.इतर शहरांप्रमाणेच मुंबईतील प्रत्येक विभागात आठवडय़ातून एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवल्यास पाणी बचत होऊन त्याचा मुंबईकरांनाच फायदा होऊ शकेल, असा एक मतप्रवाह जलविभागातील काही अधिकाऱ्यांचा आहे.

ल्ल आठवडय़ातून एक दिवस प्रत्येक विभागाचा पाणीपुरवठा बंद करायचा झाला तर ते तांत्रिकदृष्टय़ा सोयीचे ठरेल आणि नेमके किती पाणी वाचले याचा ताळेबंदही मिळेल. १० टक्के पाणीकपात केल्यानंतर नेमके किती पाणी वाचते याचा अंदाजच लागत नाही. कारण तलावातून पूर्वीप्रमाणेच पाणी मुंबईत आणले जाते. केवळ पाणीपुरवठय़ाच्या वेळेत कपात केली जाते. किंबहुना या कपातीचाच फारसा उपयोग होत नाही. बहुतांश वेळा पाणीपुरवठा बंद होण्यापूर्वी १०-१५ मिनिटे आधीच पाणीपुरवठा बंद होतो. त्यामुळे विभागात पाण्याचे असमान वितरण होते. दुसऱ्या टोकाला राहणाऱ्या रहिवाशांच्या पाणीपुरवठय़ावर त्याचा परिणाम होतो आणि या मंडळींना स्थानिक नगरसेवक आणि पालिका कार्यालयात खेटे घालावे लागतात. मात्र कपात असल्यामुळे त्यांच्या पाणीपुरवठय़ात कोणतेही बदल करणे पालिकेला शक्य होत नाही. अशी ओरड साधारणपणे संपूर्ण मुंबईतच सुरू असते. त्यामुळे अशी कपात लागू करण्याऐवजी प्रत्येक विभागात आठवडय़ातून एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवल्यास त्याचा पालिकेला आणि नागरिकांनाही फायदा होऊ शकतो. पाणी येणार नसल्याची कल्पना असल्यामुळे नागरिक आदल्या दिवशी अतिरिक्त पाणी साठवून ठेवतील. त्यामुळे त्यांची गैरसोय होणार नाही आणि पालिकेचे कामही सोपे होईल. परंतु कायम आपली मतपेटी जपण्याचा प्रयत्न करणारी राजकारणी मंडळी या पर्यायाला तयार होणार नाहीत, असे जल विभागातील अधिकाऱ्यांचे ठाम मत आहे. त्यामुळे राजकारण्यांच्या गळ्यात घंटा कोण बांधणार असा प्रश्ना असल्यामुळे यावेळीही पाण्याचा हिशेब न लागणाऱ्या कपातीचा पर्याय पालिकेला निवडावा लागणार आहे.

First Published on August 26, 2015 3:13 am

Web Title: at least one day save water
टॅग Save Water