शिक्षण क्षेत्रात प्रगती होत असताना महापालिकेच्या शाळांचा दर्जा सुधारावा आणि शाळांमध्ये विद्यार्थ्यांंची पटसंख्या वाढावी या उद्देशाने महापालिकेने माजी पंतप्रधान व भाजपचे ज्येष्ठ नेते अटलबिहारी वाजपेयी यांच्या नावाने ‘अटलबिहारी वाजपेयी विद्या संवर्धन योजना’ सुरू केली असताना ती केवळ कागदावरच राहिली आहे.
शिक्षण क्षेत्रात अनेक बदल होत असताना गेल्या काही वर्षांत महापालिका शाळांचा दर्जा खालावत चालला आहे. विद्यार्थी संख्या नसल्यामुळे महापालिका शाळा बंद पडत असल्यामुळे शिक्षकांची संख्या अतिरिक्त होत आहे. शिक्षकांना कर विभागात काम दिले जात आहे. महापालिकेच्या शाळेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांंनी प्रवेश घ्यावा आणि शिक्षणापासून कोणी वंचित राहू नये या उद्देशाने महापालिका शाळेमध्ये पहिल्या वर्गात प्रवेश घेणाऱ्या व तो विद्यार्थी सहाव्या वर्गापर्यंत त्याच शाळेत राहिला पाहिजे आणि त्याची उपस्थिती ७५ टक्के राहिली तर महापालिकेतर्फे त्याला अटलबिहारी वाजपेयी विद्या संवर्धन योजनेअंतर्गत ३ हजार रुपये विमा राशी देण्यात येणार होती. मात्र, ही योजना केवळ कागदावर राहिली असून त्याची अंमलबजावणी करण्यात आली नाही. गेल्या काही वर्षांतील शाळेचा दर्जा बघता अनेक पालकांनी विद्यार्थ्यांंना खासगी किंवा जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये प्रवेश दिला. महापालिका शिक्षणावर कोटय़वधी रुपये खर्च करीत असून त्यासाठी विविध योजना राबवित आहे. मात्र, त्याला प्रतिसाद मिळत नाही. शिक्षक आहे तर विद्यार्थी नाही, अशी अनेक शाळांची अवस्था आहे. महापालिकेचा विकास व्हावा किंवा उत्पन्न वाढावे या उद्देशाने अनेक योजना सुरू करण्यात आल्या. मात्र, त्याला प्रतिसाद न मिळाल्याने त्या बंद पडल्या आहेत. त्यात ही विद्या संवर्धन योजनाचा समावेश आहे. अटलबिहारी वाजपेयी यांच्या नावाने महापालिकेने प्रथमच शिक्षण क्षेत्रात ही योजना सुरू केली असताना त्याची अंमलबजावणी करण्यात आली नाही. महापालिका शाळेचा शिक्षणाचा दर्जा सुधारावा यासाठी गेल्या काही वर्षांत पथनाटय़ सादर करून शिक्षण विभागाची माहिती आणि योजना लोकापयर्ंत पोहोचविली. ज्ञानधारा या उपक्रमांतर्गत विविध उपक्रम राबविण्यात आले. या सर्व उपक्रमामुळे महापालिका शाळांमधील पटसंख्या वाढेल, असा प्रयत्न असला तरी त्यात महापालिकेचा शिक्षण विभाग मात्र अपयशी ठरला असल्याचे समोर आले आहे. याबाबत महापालिकेचे शिक्षणाधिकारी दीपेंद्र लोखंडे यांनी सांगितले, शाळांमध्ये पटसंख्या वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जातात. वाजपेयी यांच्या नावाने सुरू केलेल्या योजनेचे काय झाले याची माहिती घ्यावी लागेल.