दोन कैदी पळाल्याच्या घटनेनंतर जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील गैरप्रकार व भोंगळ कारभार चव्हाटय़ावर आल्याने प्रभारी कारागृह अधीक्षक सचिन साळवी यांची धुळे येथे बदली करण्यात आली, तर त्यांच्याजागी नियमित कारागृह अधीक्षक म्हणून गणेश महल्ले यांनी सूत्रे स्वीकारली आहेत. मुंबईहून थेट चंद्रपुरात बदलून आलेले महल्ले यांच्यासमोर कारागृहात आजवर चालणारे गैरप्रकार बंद करण्याचे आव्हान आहे.
शहराचे मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या जिल्हा मध्यवर्ती कारागृहाची सुरक्षा भिंत भेदून लंकेश मट्टामी व नरेश कुमरे हे दोन नक्षलवादी समर्थक कैदी पळून गेले होते. यातील एकाला अटक करण्यात शहर पोलिसांना यश आले असले तरी दुसरा कैदी अजूनही फरार आहे. दरम्यान, या घटनेमुळे कारागृहातील गैरप्रकार चव्हाटय़ावर आले. त्यामुळे प्रभारी कारागृह अधीक्षक साळवी यांची बदली करण्यात आली. गेल्या ३१ मार्चला कारागृह अधीक्षक टिकले सेवानिवृत्त झाल्यानंतर प्रभारी अधीक्षक म्हणून सचिन साळवी यांच्याकडे सूत्रे सोपविण्यात आली होती. अधीक्षकाची खुर्ची मिळताच त्यांनी कैद्यांना सुखसुविधा उपलब्ध करून देण्याचा सपाटा लावला. साळवी अधीक्षक होताच अवघ्या पंधरा दिवसात कारागृहातील कैद्यांजवळ मोबाईल मिळाला. एवढेच नाही, तर कैद्यांजवळ गांजा, चरस, बिडी, पान, खर्रा सुध्दा मिळाला. केवळ या सुविधाच नाही, तर कैद्यांना अतिविशिष्ट सेवाही उपलब्ध करून देण्यात येत होती. घुग्घुस हत्याकांडातील मुख्य आरोपी हाजी सरवर व त्याच्या सहकाऱ्यांनाही कारागृहात अशाच पध्दतीने अतिविशिष्ट सेवा उपलब्ध करून देण्यात आली होती. पोलिस अधीक्षकांनी कारागृहाला भेट दिली असता हा सर्व प्रकार उघडकीस आला होता. त्यामुळे हाजी सरवर याला नागपूरच्या कारागृहात स्थलांतरित करण्यात आले. त्याचवेळी हाजीने पैसे देऊनही सुविधा उपलब्ध करून दिली नाही म्हणून साळवी यांना कारागृहाच्या मुख्य प्रवेशव्दारावर जीवे मारण्याची धमकी दिली होती.
केवळ हा एकच प्रकार नाही, तर कारागृहातील काही व्हीआयपी कैद्यांना घरचे जेवणही उपलब्ध करून देण्यात येत होते. कैद्यांना पान व खर्रा उपलब्ध करून देण्यासाठी तर दोन पोलिस शिपाई आहेत. काही कैद्यांना तर कारागृहात घरच्यासारखी सेवा मिळत आहे. या सर्व प्रकारामुळे कारागृहातील सुरक्षा खिळखिळी झाली होती. नेमका या संधीचा फायदा घेऊन कारागृहाची मुख्य तटरक्षक भिंत भेदून लंकेश मट्टामी व नरेश कुमरे हे दोन नक्षलवादी समर्थक कैदी पळून गेले. या दोन कैद्यांचा वावर कारागृहात अतिशय संशयास्पद होता. मात्र, त्याकडे कारागृह अधीक्षक साळवी यांचे पूर्णत: दुर्लक्ष झाले होते. कारागृह अधीक्षकांच्या दुर्लक्षातूनच यापूर्वी एका कैद्याने कारागृहात आत्महत्या केली होती, तर एका कैद्याला जिल्हा रुग्णालयात आरोग्य तपासणीसाठी नेले असता त्याने तेथून पळ काढला होता. तसेच काही कैद्यांनी मध्यंतरी कारागृह व्यवस्थापनाविरोधात आवाज उठवून उपोषणही सुरू केले होते. मात्र, वरिष्ठांच्या मध्यस्थीनंतर कैद्यांनी उपोषण मागे घेतले होते. त्यामुळे साळवी यांच्या असंख्य तक्रारी कारागृह उपमहानिरीक्षक शिंदे यांच्या कार्यालयाला प्राप्त झाल्या.
कारागृहात अधीक्षकाचे नाही, तर कैद्यांचे राज्य असल्यासारखे चित्र निर्माण झाले होते. कैदी पळून गेल्याच्या घटनेनंतर प्रभारी उपमहानिरीक्षक व्ही.व्ही.शेकदार व त्यानंतर शिंदे यांनी येथील कारागृहाला भेट देऊन परिस्थितीची माहिती जाणून घेतली. यात कारागृहातील कर्मचाऱ्यांचे मत जाणून घेतले असता त्यातूनही साळवी यांच्याविरोधात सूर उमटत असल्याचे बघून त्यांची तडकाफडकी धुळे येथे बदली करण्यात आली आहे. नियमित कारागृह अधीक्षक म्हणून गणेश महल्ले रुजू झाले आहेत. मुळचे मुंबईकर असलेले महल्ले तेथे सिनिअर जेलर होते. त्यांना पदोन्नती देऊन चंद्रपूरला पाठविण्यात आले आहे, तर सिनिअर जेलर साळवी यांच्या रिक्त झालेल्या जागी भंडारा येथून सिनिअर जेलर म्हणून अशोक जाधव रुजू झाले आहेत. या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी येथे सूत्रे स्वीकारली असून साळवी यांच्या कार्यकाळात कारागृहाची घसरलेली पत मिळवून देण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे. महल्ले यांनी पदभार स्वीकारतांच सर्व अवैध धंदे व गैरप्रकार बंद करण्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. कारागृहातून कैदी फरार झाल्यानेच साळवी यांचा बळी घेतल्याची चर्चा कारागृहाच्या वर्तुळात आहे.