तीन दिवसांच्या गोंधळानंतर अखेर जिल्हा प्रशासनाने क्लेरा ब्रुस शाळेच्या मैदानावरुन फटाका विक्रेत्यांना आज हटवले. फटाका विक्रेत्यांना त्याचा मोठा आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे. शिवसेनेचे आमदार अनिल राठोड यांनी शाळेच्या मैदानावर फटाका विक्रेत्यांना परवानगी मिळावी, यासाठी दिवसभर उपोषण केले. मात्र न्यायालयाच्या आदेशामुळे जिल्हाधिकाऱ्यांचाही नाईलाज झाला. नागरिकांनाही या दिवसभराच्या गोंधळामुळे मोठीच गैरसोय सहन करावी लागली.
या गोंधळामुळे काही विक्रेत्यांनी मैदानाच्या परिसरातील रस्त्यावरच मिळेल त्या जागी फटाके विक्रीस सुरुवात केली. फटाका विक्रेते संघटनेचे अध्यक्ष कैलास गिरवले यांनी काही विक्रेते माळीवाडा भागातील आंबेडकर रस्त्यावर स्टॉल मांडणार असल्याचे, तर काही विक्रेते आपापल्या भागात विक्री करणार असल्याची माहिती दिली. नगर ही महाराष्ट्रातील फटाक्याची घाऊक आणि मोठी बाजारपेठ आहे. राज्यात निम्म्यापेक्षा अधिक ठिकाणी नगरहून फटाके घेतले जातात. लक्ष्मीपूजनाच्या नेमक्या आदल्या दिवशीच हा प्रकार झाल्याने या व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.  
फटाका विक्रेते संघटनेने गेल्या वर्षीही याच शाळेच्या मैदानावर विक्री स्टॉल उभारले होते. परंतु त्यावेळी कोणी हरकत घेतली नाही. या जागेबद्दल बांधकाम व्यावसायिक शरद मुथा व जागामालक मराठी मिशन यांच्यात न्यायालयीन वाद सुरु आहेत. न्यायालयाने मैदानाचा वापर करण्यास मनाई केलेली आहे. विक्रेत्यांनी गेल्या दि. २५ सप्टेंबरला स्टॉल उभारले, मात्र मुथा यांनी १० ऑक्टोबरला जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली. जिल्हाधिकाऱ्यांनी मैदानावर फटाके विक्रीस मनाईची नोटीस दि. ३१ ऑक्टोबरला रात्री जारी केली. संघटनेने त्याविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली, अध्यक्ष गिरवले यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशास तूर्त स्थगिती दिल्याचा दावा काल केला होता, प्रत्यक्षात मात्र उच्च न्यायालयाने न्यायालयाच्या अटी पाळून जिल्हाधिकाऱ्यांनी सहानुभूतीपूर्वक निर्णय घ्यावा, असा आदेश दिला होता. फटाके विक्रीचा व्यवसाय केवळ चार-पाच दिवसांचाच असतो, ऐनवेळी सुरक्षेच्या दृष्टीने पर्यायी ठिकाणी स्टॉल उभारणे शक्य नसल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे होते.
शुक्रवारी रात्री पुन्हा साडेबाराच्या सुमारास जिल्हाधिकाऱ्यांनी मनाई आदेश जारी केला. परंतु स्टॉल सकाळी सुरळीत सुरु होते. राठोड, विक्रेते व जिल्हाधिकारी यांच्यात सकाळी बैठक झाली, त्या वेळी पर्यायी जागेचा विचार करण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केली. दुपारी साडेबाराच्या सुमारास अचानक मैदानावर पोलीस फौजफाटा धडकला. त्यांनी स्टॉल बंद करावयास लावून फटाके घेण्यास आलेल्या नागरिकांनाही मैदानाबाहेर पिटाळले, विक्रेत्यांना स्टॉल खाली करायला लावले, त्यामुळे मोठी धावपळ उडाली. राठोड यांनीही तेथे धाव घेत, मैदानावरच विक्रीसाठी परवानगी मिळावी या मागणीसाठी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात उपोषण सुरु केले. संघटनेचे संजय जाधव, श्रीनिवास बोज्जा, टकले यांच्यासह सेनेचे संभाजी कदम, भगवान फुलसौंदर, अनिल शिंदे, दिलिप सातपुते आदी पदाधिकारी होते. पोलिसांचे धडक कृती दलही तेथे तैनात करण्यात आले.
सरकार, जिल्हाधिकारी, प्रशासनाच्या विरोधात जोरदार निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. निषेध व्यक्त करण्यासाठी राठोड यांनी तेथे फटाक्यांची लडही फोडली. जिल्हाधिकारी, राठोड, कदम यांच्यातील चर्चाही निष्फळ ठरली. अखेर संघटनेच्याच विनंतीमुळे राठोड यांनी सायंकाळी उपोषण मागे घेतले.

सावेडीत लगेचच दरवाढ
क्लेरा ब्रुस शाळेच्या मैदानावरील गोंधळाची परिस्थिती पाहून फटाके खरेदीसाठी आलेले नागरिक परत जात होते. फटाके मिळणार नाहीत, म्हणून लहान मुलांचे चेहरे रडवेले झाले होते. पोलीस तर नागरिकांनाही मैदानाबाहेर पिटाळत होते. शहराच्या प्रोफेसर कॉलनी चौकाजवळील जॉगिंग ट्रॅकवरही फटाके विक्रीचे स्टॉल लागतात. शाळेच्या मैदानावरील गोंधळ पाहून अनेक नागरिक फटाक्यांसाठी सावेडीत धाव घेत होते. त्यामुळे तेथील काही विक्रेत्यांनी लगेच भाव वाढवले. दुपारपर्यंत तेथील फटाकेही संपले होते. शाळेच्या मैदानावरील प्रश्न मार्गी लागत नाही हे पाहून काही विक्रेत्यांनी सायंकाळच्या सुमारास मैदानालगतच्या रस्त्यावरच स्टॉल मांडून विक्रीस सुरुवात केली होती, नागरिकांनीही तेथे गर्दी केली होती.