सतत गैरहजर असल्याच्या कारणामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नामदेवराव कावरखे यांचे सदस्यत्व रद्द करण्याचा निर्णय कायम ठेवत जिल्हा उपनिबंधकांनी कावरखे यांना अपात्र घोषित केले. बाजार समितीचे सदस्य सुनील पाटील गोरेगावकर यांनी जिल्हा उपनिबंधकांकडे दोन वेळा गैरहजर असल्याच्या कारणामुळे सदस्यत्व रद्द करण्याची तक्रार केली होती. २३ डिसेंबर २०११ रोजी त्यांना अपात्र घोषित करण्यात आले. मात्र, त्याच्या विरोधात कावरखे यांनी अपील दाखल केले होते. एकापेक्षा अधिक वेळा गैरहजर राहून कायद्याचे उल्लंघन केले असल्याने त्यांचे सदस्यत्व रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. विभागीय सहनिबंधकांनी उपनिबंधकाच्या निर्णयाची तपासणी केली. दिलेल्या निर्णयास उच्च न्यायालयातही कावरखे यांनी आव्हान दिले होते. या प्रकरणाचे पुनर्विलोकन जिल्हा उपनिबंधकांनी करावे, असे निर्देश उच्च न्यायालयाकडून देण्यात आले होते. पुनर्विलोकनातही कावरखे यांचे सदस्यत्व अपात्र असल्याचे शुक्रवारी बजावण्यात आलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.