महावितरणचे चालू बिल ९६ लाख रुपये न भरल्यामुळे लातूर शहराच्या पथदिव्यांची वीजजोडणी दहा दिवसांपासून तोडली होती. मात्र, बुधवारी महापालिकेने ९६ लाख रुपयांची रक्कम भरणा केल्यानंतर महावितरणने वीजजोडणी पुन्हा दिली.
महापालिकेने वसुली अभियान वेगाने राबवले. गेल्या दोन महिन्यांपासून कर्मचाऱ्यांचा पगार थकीत आहे. शहरातील पथदिवे सुरू होण्याला प्राधान्य देऊन महापालिकेने आधी वीज सुरू केली. एलबीटी कर शहरातील काही व्यापारी भरत आहेत. परभणी व चंद्रपूरप्रमाणे एलबीटी भरण्याचा वेग वाढला, तर शहरात नागरी सुविधा उपलब्ध करणे सोयीचे जाणार आहे. लातूरवासीयांनी कराचा भरणा त्वरित करून विकासकामात आपले योगदान द्यावे, असे आवाहन महापालिकेचे प्रभारी आयुक्त डॉ. धनंजय जावळीकर यांनी केले. बुधवापर्यंत एलबीटीचा कर २७ लाख १७ हजार रुपये जमा झाला. या रकमेत मोठी वाढ होण्याची गरज आहे.