मनसेचे स्वीकृत नगरसेवक गिरीश धानूरकर यांनी दादरमधील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या १८५ क्रमांकाच्या ज्या शाखेत बोलावून पालिका अभियंत्याला मारहाण केली, त्या शाखेतील अनधिकृत पोटमाळा तोडण्याची तयारी पालिकेने केली असून बुधवारी या अनधिकृत बांधकामाविरुद्ध नोटीस बजावण्यात आली. पोटमाळा पालिकेने तोडू नये, यासाठी धानूरकर यांनी पालिकेच्या सहायक आयुक्तांवरच दबाव आणण्यास सुरुवात केली आहे. आयुक्तांचे आदेश असतानाही सहायक आयुक्त त्याकडे कानाडोळा करीत असल्याचा आरोप केला जात आहे.
मनसेच्या शाखेतच अनधिकृत पोटमाळा असताना नगरसेवक धानुरकर यांनी कनिष्ठ अभियंता राजेश राठोड यांना शाखेत बोलावून मारहाण केली. फोन घेतला नाही, या किरकोळ मुद्दय़ावरून राठोड यांना मारहाण झाल्यामुळे पालिकेतील अभियंत्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही आता या प्रकाराची गंभीर दखल घेऊन धानूरकर यांना समज दिल्याचे कळते. पालिका आयुक्त सिताराम कुंटे यांनी मनसे शाखेचे अनधिकृत बांधकाम तोडण्याचे आदेश सहाय्यक पालिका आयुक्त उघडे यांना दिले असून त्यानुसार ही नोटीस बजाविण्यात आली आहे. दरम्यान अभियंता संघटनेने या शाखेतील अनधिकृत बांधकामप्रकरणी धानूरकर यांचे नगरसेवकपद रद्द करण्याच मागणी केली असून या मारहाणीमुळे अस्वस्थ असलेले अभियंते राठोड हे अजूनही कामावर रुजू झालेले नाहीत.
दरम्यान, सहाय्यक पालिका आयुक्त उघडे यांनी नोटिस देण्यास दिरंगाई केल्यामुळे अभियंत्यांमध्ये त्यांच्या विरोधात नाराजी निर्माण झाली आहे. सहायक आयुक्त कारवाई करण्यास टाळाटाळ करीत असून शाखेचे अनधिकृत बांधकाम वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा आरोप अभियंता संघटनेच्या एका पदाधिकाऱ्याने केला आहे. गेल्या गुरुवारी राठोड यांना धानुरकर यांनी मारहाण केल्यानंतर आठवडाभर उघडे का गप्प बसून होते, असा सवालही उपस्थित करण्यात येत असून सहाय्यक पालिका आयुक्तांना मारहाण झाली असती तर अशीच भूमिका घेतली असती का, असा सवाल पालिका अभियंता संघटनेचे सरचिटणीस साईनाथ राजाध्यक्ष यांनी विचारला आहे.