मंगळवेढा तालुक्यातील मरवडे-येड्राव रस्त्यावर एका दहा वर्षांच्या मुलीचा निर्घृणपणे खून करून मृतदेह पुलाखाली टाकून देण्यात आल्याची घटना उघडकीस आली. मृत मुलीची ओळख पटली नसून, तिचा खून कोणी व कशासाठी केला, याचे कोडे उलगडले नाही. याबाबत मंगळवेढा पोलीस अधिक तपास करीत आहेत.
मरवडे गावच्या शिवारात रस्त्याच्या पुलाखाली एका लहान मुलीचा मृतदेह आढळल्याची माहिती मिळताच मंगळवेढा पोलिसांनी तेथे धाव घेतली असता सदर मृतदेह सडलेल्या अवस्थेत दिसून आला. हा खून दोन-तीन दिवसांपूर्वी झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. अज्ञात मारेकऱ्याने अज्ञात कारणावरून हत्याराने हात-पाय तोडून तिचा खून केला अस अंगावर पांढऱ्या रंगाचा फ्रॉक व लाल रंगाचे स्कार्फ गुंडाळलेल्या स्थितीत मृतदेह पडलेला होता. खून केल्यानंतर गुन्हय़ाचा पुरावा नष्ट करण्याच्या हेतून मारेकऱ्याने मृतदेह रस्त्याच्या पुलाखाली टाकून दिल्याचे दिसून आले. या गुन्हय़ाचा तपास पोलीस निरीक्षक संजयकुमार गिड्डे हे करीत आहेत.
शेतकऱ्याचा खून
अक्कलकोट तालुक्यातील वागदरी येथे शेतजमिनीच्या बांधाच्या वादातून सोमशेखर राचप्पा जावळकोटी (वय ५६) या शेतकऱ्याचा कुऱ्हाडीने डोक्यावर, पाठीवर, छातीवर सपासर वार करून खून करण्यात आला. याप्रकरणी सोमनाथ वीरभद्रय्या विजापुरे (रा. हिरोळी, ता. आळंद, जि. गुलबर्गा, कर्नाटक) याच्याविरुद्ध अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. वागदरी शिवारात मृत सोमशेखर जावळकोटी व आरोपी सोमनाथ विजापुरे यांची शेतजमीन एकमेकास लागून आहे. परंतु शेतजमिनीच्या बांधावरून दोघात वाद धुमसत होता. त्याचे पर्यावसान सोमश्खर यांच्या हत्येत झाले. सोमनाथ विजापुरे यास पोलिसांनी अटक केली असून त्यास पाच दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे.