महापालिकेच्या वैद्यकीय विभागातील दोन अधिकाऱ्यांवर खंडणीचे गुन्हे दाखल झाल्याची घटना ताजी असतानाच पालिकेचे अतिरिक्त आयुक्त तथा तत्कालीन मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय पत्तीवार यांच्यासह वैद्यकीय विभागातील तीन कर्मचाऱ्यांवर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा सीबीडी पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. या घटनेने पालिका कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली असून असा कोणताच गुन्हा दाखल न झाल्याचा दावा करणाऱ्या पालिका प्रशासनाचे पितळ पुन्हा एकदा उघडे पडले आहे.
महापालिकेच्या वैद्यकीय विभागात पब्लिक हेल्थ व्हिजिटर सॅनेटरी इन्फेक्टर असलेल्या सतीश औसरमल याला २००६ साली कामावरून कमी करण्यात आले होते. कर्तव्यावर असताना तत्कालीन मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय पत्तीवार, क्षयरोग विभागाच्या डॉ. विद्या क्षीरसागर आणि घनकचरा विभागाचा सुपरवाझर धनंजय खरे यांनी वारंवार मानसिक त्रास आणि जातिवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी महापालिका आयुक्त, समाजकल्याण विभाग आदींकडे लेखी तक्रार केली होती. यादरम्यान त्याची कोपरखैरणे आरोग्य केंद्रात बदली करण्यात आली होती. मात्र त्याला कामावर रुजू होण्यास मज्जाव करण्यात आला होता. या वेळी कामावरून कमी केल्याचे त्याला सांगण्यात आले होते. अखेर या प्रकरणी औसरमल याने वाशी न्यायालयात धाव घेतली होती.
या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशानुसार सीबीडी पोलीस ठाण्यात अतिरिक्त आयुक्त डॉ. पत्तीवार, डॉ. क्षीरसागर आणि खरे या तिघांविरोधात अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्हय़ाचा अधिक तपास साहाय्यक पोलीस आयुक्त विवेक मासाळ हे करीत आहेत. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक चौकशी सुरू आहे. चौकशीचा अहवाल न्यायालयापुढे सादर करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. या संदर्भात डॉ. पत्तीवार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तो होऊ शकला नाही. या प्रकरणी पालिकेचे प्रशासन उपायुक्त जगन्नाथ सिन्नरकर यांच्याशी संपर्क साधला असता, असा गुन्हा दाखल झाला नसून या प्रकरणी असा प्रकार घडला आहे का, अशी चौकशी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले आहे.