जिल्हा परिषदेतील सत्ताधारी-विरोधकांमध्ये सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपाच्या नाटय़ाला शुक्रवारी नवे वळण मिळाले. जि. प.च्या नावावर जमिनीचा फेर झाला नसताना, नियमबाह्य़ ठरावाआधारे नाटय़गृह व व्यापारी संकुलाच्या कामासाठी वास्तुविशारद नेमण्याची जाहिरात देऊन जि. प.ची १०० कोटींची मालमत्ता पुण्याच्या बिल्डरच्या घशात घालण्याचा डाव प्रशासनाने आखला असल्याची तोफ खासदार सुभाष वानखेडे यांनी डागली.
या बाबत लोकायुक्तांकडे तक्रार करून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशाराही त्यांनी दिला.
जि. प.त शिवसेनेची सत्ता असली, तरी याच पक्षाचे खासदार वानखेडे यांनी दिलेल्या या इशाऱ्यामुळे आगामी काळात याचे काय पडसाद उमटतात, याची उत्सुकता निर्माण झाली आहे.
जि. प.च्या ७ नोव्हेंबरच्या सभेत सभागृहाने जमिनीचा फेर जि. प.च्या नावाने करण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी करणे, या जागेवर नाटय़गृह व व्यापारी संकुल बांधण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवून त्यासाठी निधी मागण्याचा प्रस्ताव सभागृहात संमत केला. परंतु सत्ताधाऱ्यांनी प्रस्तावात बदल करून कार्यवृत्तान्तामध्ये बांधा-वापरा हस्तांतरित करा, अशी नोंद केली.
 एवढेच नाही, तर या साठी वास्तुविशारद नेमण्यास जाहिरात प्रसिद्ध केल्याने नाटय़गृह व व्यापारी संकुलाचा मुद्दा ६ फेब्रुवारीच्या जि. प. सभेत गाजला. कार्यवृत्तान्तात केलेल्या चुकीमध्ये दुरुस्ती करण्याचे आश्वासन सत्ताधाऱ्यांनी सभागृहाला दिल्याने वादावर पडदा पडला.
परंतु आता हाच मुद्दा लावून धरत खासदार वानखेडे यांनी वास्तुविशारद जाहिरातीच्या मुद्दय़ावरून जि. प. प्रशासनाला दोषी ठरवून बेमुदत उपोषण करण्याचा इशारा देत चौकशीची मागणी केली.
या संदर्भात ‘लोकसत्ता’शी बोलताना वानखेडे म्हणाले की, मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प.मध्ये सरकारचे जबाबदार प्रतिनिधी आहेत. सभागृहातील कामकाज नियमानुसार करून घेण्याची जबाबदारी त्यांच्यावर असते. मात्र, सभागृहात ऐनवेळी नाटय़गृह व व्यापारी संकुलाच्या ठरावात बांधा, वापरा व हस्तांतरित कराचा मूळ प्रस्तावात उल्लेख नसताना तो कार्यवृत्तान्तात नोंदविला.
मुळात ठरावच नियमबाह्य़ असताना जमिनीचा फेर जि. प.च्या नावे नसताना जि. प. प्रशासनाने वास्तुविशारद नेमण्यासाठी जाहिरात देण्याची केलेली घाई म्हणजे जि. प.ची १०० कोटींची मालमत्ता पुण्याच्या बिल्डरच्या घशात घालण्याचा प्रशासनाचा घाट असल्याचा थेट आरोप त्यांनी केला.
शहरात नगरपालिकेचे नाटय़गृह जवळपास पूर्ण झाल्याने याची वास्तविक गरज नाही. जिल्ह्य़ातील आमदार या प्रकरणी गप्प का, असा प्रश्न करून या प्रकरणात अनेकांचे हात ओले झाल्याचा आरोप त्यांनी केला. या बाबत वरिष्ठ पातळीवरून चौकशी करून दोषींविरुद्ध कारवाई व्हावी, या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा वानखेडे यांनी दिला.