कर्जतजवळील जोगेश्वरवाडी येथील हरूण इब्राहिम शेख यांच्या पोल्ट्रीफार्मवर काल रात्री चार लांडग्यांनी केलेल्या हल्ल्यात तब्बल पाच हजार गावरान कोंबडय़ा मरण पावल्या. यात शेख यांचे साडेचार लाख रूपयांचे नुकसान झाले आहे.
कर्जतजवळील जोगेश्वरीवाडी येथे हरूण शेख यांचा पोल्ट्रीफार्म आहे. काल मध्यरात्री चार लांडग्यांनी फार्मची लोखंडी जाळी तोडून आत प्रवेश केला. लांडग्यांनी हल्ला चढवत काही कोंबडय़ांचा फडशा पाडला. काही कोंबडय़ा घाबरून, तर काही चेंगरून मेल्या. पहाटपर्यंत लांडग्यांचा हा धुमाकूळ सुरू होता. त्यात पाच हजार कोंबडय़ांचा बळी गेल्याने शेख यांचे सुमारे साडेचार लाख रूपयांचे नुकसान झाले. घटनेची माहिती वन विभागाला कळविण्यानंतर वन विभागाने पंचनामा करून नुकसान भरपाईचा अहवाल शासनाला पाठवल्याचे सांगितले.
शेख यांच्यावर यामुळे मोठे संकट कोसळले आहे. पूर्वी सायकलवर फिरून ते अंडी व कोंबडी खरेदी-विक्रीचा व्यवसाय करीत असे. मागील काही महिन्यांपूर्वी त्यांनी काही नातेवाईकांकडून उधारीवर पैसे आणून हा व्यवसाय उभारला होता. त्यासाठीचे खाद्यही त्यांनी उधारीवर आणून मोठय़ा चिकाटीने पत्नीच्या मदतीने अहोरात्र कष्ट करून या कोंबडय़ा सांभाळल्या होत्या. रोज शेख स्वत: फार्ममध्येच झोपत असत. पण काल रात्री ते गावाला गेल्याने ही घटना घडली.