चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीवर चाकूने वार करून घर पेटवून दिले व स्वत:ही झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना आज इचलकरंजीत सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडली. शुभांगी अनिल घोंगले (वय ३६, रा. बोंगाळे गल्ली) असे जखमीचे नाव असून तिची प्रकृती गंभीर आहे. आगीमुळे तीन घरांचे सुमारे  ५ लाख रुपयांचे नुकसान झाले. तर आग विझवताना  अग्निशामक दलाचा जवान जायबंदी झाला आहे.
बंगला रोडवरील बोंगाळे गल्ली येथे अनिल रामचंद्र घोंगले हा आपल्या कुटुंबासह राहण्यास आहे. तो वहिफणीचे काम करतो. तर त्याची पत्नी यंत्रमागावर कांडय़ा भरण्याचे काम करते. एका इलेक्ट्रॉनिक्स दुकानचालकाशी संबंध असल्याच्या कारणावरून गत काही दिवसांपासून अनिल हा पत्नी शुभांगीवर संशय घेत होता. या दाम्पत्यात यावरून सतत वाद होत होता. या वादामुळे अनिल व त्याची पत्नी एकाच घरात पण विभक्त राहत होते.
आज सकाळी शुभांगी स्वयंपाक करण्यास गेली असता रागातून अनिल याने तिच्यावर चाकूने वार केले. पोटात तसेच मांडीवर जबर वार झाल्याने ती गंभीर जखमी झाली. त्यातच अनिलने तिच्यावर रॉकेल ओतून तिला पेटवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र शुभांगीने तेथून बाहेर पळ काढला.
या दरम्यान अनिल याने राहत्या घरालाच आग लावली. आगीमुळे अनिल याच्या घरासह त्याचा भाऊ सुनील रामचंद्र घोंगले व भाडेकरु सुनील आरेकर यांच्या घरातील प्रापंचिक साहित्यही आगीत जळून खाक झाले. या वेळी आग विझवण्याचा प्रयत्न करताना नगरपालिका अग्निशामक दलाचे कर्मचारी राजमहंमद समशेर शेख (वय ४५ ) हे उंचावरून पडल्याने त्यांचा हात मोडला आहे.
यातच अनिल याने पुन्हा झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यासह राजमहंमद शेख यांच्यावर आयजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर  शुभांगी हिची प्रकृती गंभीर असल्याने तिला कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या प्रकरणी अनिल याच्यावर पत्नीला जिवे मारण्याचा आणि आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.  अधिक तपास पो.उ.नि. यशवंत ढगे करीत आहेत.