टोल देण्यास नकार दिल्याच्या कारणावरून टोल वसुली करणाऱ्या आयआरबी कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी टेम्पोचालकास सोमवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास जबर मारहाण केली. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी पुईखडी टोल नाक्यावर हल्ला चढवून त्याची प्रचंड नासधूस केली. या प्रकारामुळे परिसरात रात्री मोठा तणाव पसरला होता. शिवसेनेचे आमदार चंद्रदीप नरके, जिल्हाप्रमुख संजय पवार, जिल्हाप्रमुख विजय देवणे यांच्यासह अनेक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. टोल वसुली सुरू झाल्यानंतर टोल नाक्याची नासधूस होण्याचा हा पहिला मोठा प्रकार आहे.    
आयआरबी कंपनीच्या वतीने शहरातील अंतर्गत रस्त्यांवर टोल आकारणीचे काम १७ ऑक्टोबरपासून सुरू केले आहे. तर याच्या विरोधात टोलविरोधी कृती समितीच्या माध्यमातून आंदोलन सुरू आहे. रविवारी कृती समितीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन व जिल्हाधिकाऱ्यांना घेराओ घालण्याचे आंदोलन जाहीर केले होते. या आंदोलनाच्या तयारीत कृती समितीचे कार्यकर्ते गुंतले असताना सोमवारी सायंकाळी टोल वसुलीवरून मारहाणीचा प्रकार घडला.
सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास पुईखडी टोलनाका येथून तानाजी कुरकले हे  टेम्पो घेऊन जात होते. आदर्श टेम्पो असोसिएशनचे ते प्रमुख पदाधिकारी आहेत. त्यांनी टोलविरोधी कृती लढय़ाची भूमिका घेत या टोल नाक्यावर टोल न भरण्याची भूमिका घेतली. आपल्या भूमिकेवर ते ठाम होते. त्यातून टोल वसुली करणाऱ्या आयआरबी कर्मचाऱ्यांशी त्यांची हुज्जत झाली. त्यातूनच त्यांना टोल वसुली करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून मारहाणीचा प्रकार घडला. टेम्पो असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यास मारहाण झाल्याचे वृत्त कळताच टेम्पो चालकांनी या नाक्याकडे धाव घेतली. पाठोपाठ परिसरातील नागरिकही तेथे मोठय़ा संख्येने जमले.    
टेम्पोचालकास झालेल्या मारहाणीमुळे संतप्त झालेल्या जमावाने आक्रमक  भूमिका घेतली. त्यांनी टोल नाक्यावर दगडफेक करीत आपला राग व्यक्त केला. टोल नाक्याची केबिन, त्याच्या काचा, विजेचे दिवे, फर्निचर आदी साहित्याची मोठय़ा प्रमाणात नासधूस केली. या घटनेची माहिती समजल्यावर आमदार नरके, पवार, देवणे आदी प्रमुख टोल नाक्यावर पोहचले. नागरिकांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे टोल नाका परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तेथे पोलीस बंदोबस्त मोठय़ा प्रमाणात वाढविण्यात आला.