अॅसिड हल्ला हे मुलीच्या आयुष्यातील अत्यंत दु:सह आणि भयानक दु:स्वप्न असते. पण एखादीवर अॅसिड हल्ला झाल्यानंतर थोडा काळ त्याची चर्चा होते आणि मगसर्व सामसूम होऊन जाते. पुढे या मुलींचे काय झाले याची कोणालाच फिकीर नसते. दिल्लीच्या राहुल सहारन या छायाचित्रकाराने अशाच काही पीडित मुलींचे एक ‘फॅशन फोटोशूट’ केले असून त्यातून सौंदर्याबाबतच्या व्याख्या बदलण्याचा प्रयत्न त्याने केला आहे. या मुलींनी छान कपडे घालून सजून मॉडेल्सप्रमाणे फोटोशूट केले आहे. सध्या हे फोटोशूट फेसबुकवर प्रचंड गाजत आहे.
फोटो गॅलरीः कुरूप झालेल्या चेहऱ्यांमागील सौंदर्य शोधण्याचा प्रयत्न!
राहुल गेले काही वर्ष दिल्लीमधील ‘छाव’ या स्वयंसेवी संस्थेसाठी काम करत होता. काही दिवसांपूर्वी संस्थेतील रूपा या तरुणीने डिझाइन केलेल्या कपडय़ांच्या कलेक्शनचा एक कॅटलॉग करण्यासाठी संस्थेमधून त्याला विचारण्यात आले. रूपा स्वत: अॅसिड हल्ल्यातून सावरलेली एक मुलगी आहे. ‘मी जेव्हा रूपाची कहाणी ऐकली, तेव्हा या फोटोशूटमधून केवळ तिने तयार केलेले कपडेच नाही, तर तिचा आतापर्यंत प्रवास, तिची जिद्द, मेहनत ही सुद्धा लोकांपर्यंत पोहचवायचे हे मी ठरवले,’ असे राहुलने सांगितले. त्यातूनच रूपा आणि तिच्यासारख्या अन्य मुलींना घेऊन हे फोटोशूट करण्याचे त्याने नक्की केले आणि रूपासोबत त्याच संस्थेतील रितू, लक्ष्मी, चंचल यासुद्धा फोटोशूटला तयार झाल्या.
सौंदर्याबद्दल समाजाच्या रूढ संकल्पना पुसून टाकण्याचा या फोटोशूटचा उद्देश असल्याचे राहुलने सांगितले. ‘सिनेमामध्ये किंवा मासिकांमध्ये छान मेकअप केलेल्या मॉडेल्स म्हणजेच खरे सौंदर्य अशी आपली धारणा असते. पण प्रत्यक्षात रूपासारख्या मुली भीषण दुर्घटनांमधून स्वत:ला सावरून ठामपणे उभ्या राहतात, त्यात खरे सौंदर्य असते, असे त्याचे म्हणणे आहे.
रूपावर तिच्या सावत्र आईने द्वेषापोटी अॅसिड टाकले, तर रितूवर तिच्या शेजारच्याने संपत्तीच्या भांडणावरून तर, लक्ष्मीने वयाने बऱ्याच मोठय़ा असलेल्या मुलाला लग्नाला नकार दिला म्हणून तिच्यावर अॅसिड हल्ला करण्यात आला होता. सोनम आणि चंचल यांच्यावरही त्यांच्या भागातील मवाली मुलांनी तिला धडा शिकवण्यासाठी हल्ला केला होता.
‘थोडक्यात या हल्ल्यांमागे या मुलींचा काहीही दोष नव्हता. तरीही आज समाज त्यांना वाळीत टाकतो. प्रत्यक्षात त्यांना एक स्त्री म्हणून मान मिळायला हवा आणि हा माझ्या फोटोशूटचा मूळ उद्देश असल्याचे, राहुलचे म्हणणे आहे.