ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या आंदोलनास सहकार्य करणारे सामाजिक कार्यकर्ते, प्रशासनातील अधिकारी यांच्याबद्दल स्वयंसेवी संस्थांच्या महासंघाने आगळावेगळा कार्यक्रम आयोजित करून कृतज्ञता व्यक्त केली. त्याचबरोबर जनलोकपाल विधेयक संमत झाल्याबद्दल नागरिकांना पेढे व फळे वाटून आनंदोत्सवही साजरा केला.
वाडिया पार्क क्रीडा संकुलाच्या आवारातील म. गांधी पुतळय़ाजवळ झालेल्या या कार्यक्रमास स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते. जिल्हा पोलीस अधीक्षक रावसाहेब शिंदे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रवींद्र निटूरकर, पोलीस उपअधीक्षक डॉ. अनिता जमादार, निरीक्षक ज्ञानेश्वर ढोकले, नवलनाथ तांबे व सुनील शिवूरकर तसेच हजारे यांच्या आंदोलनात त्यांच्या प्रकृतीची काळजी घेणारे जिल्हा सरकारी रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश नेवसे, डॉ. प्रेमचंद कांबळे, डॉ. दादासाहेब साळुंखे तसेच कार्यकर्त्यांना व प्रसिद्धिमाध्यमांच्या प्रतिनिधींना कृतज्ञता प्रमाणपत्र देण्यात आले.
पोलीस अनेक वेळा चांगले काम करतात, परंतु अशा कौतुक सोहळय़ाचा अनुभव त्यांना फार क्वचितच येतो, अनेकदा पोलिसांच्या चांगल्या कामाची समाजात दखलही घेतली जात नाही, त्यामुळे हा सोहळा अनोखा ठरल्याची भावना पोलीस अधीक्षक शिंदे यांनी व्यक्त केली. आम्ही आमचे कर्तव्यच केले, परंतु अशा कौतुकामुळे प्रशासनातील अधिकाऱ्यांची काम करण्याची उमेद वाढते, असे डॉ. निटुरकर यांनी सांगितले. अॅड. श्याम असावा यांचेही भाषण झाले.
स्नेहालयचे डॉ. गिरीश कुलकर्णी यांनी प्रास्ताविकात कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट केला. जनलोकपाल विधेयक संमत झाल्याबद्दल कार्यकर्त्यांनी राष्ट्रभक्तिपर गीतांवर नाच करत आनंद व्यक्त केला तसेच परिसरातील नागरिकांना व एकमेकांना पेढे, फळांचे वाटप केले. प्रमोद डागा, प्रवीण कटारिया, सुवालाल शिंगवी, आनंद त्रिपाठी, अमित कनोजिया, संदीप कुसाळकर, रमेश ससाणे, सतीश कांबळे आदी उपस्थित होते.