यशवंतराव चव्हाण यांनी देशापुढे प्रचंड आव्हाने असतानाही सकारात्मक विचार केला. त्यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तरूणांना सकारात्मक विचार करायला शिकवावे. यशवंतराव तरूणांबरोबरच काँग्रेस पक्षालाही समजलेच पाहिजेत, अशी अपेक्षा ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी व्यक्त केली.
दिवंगत लोकनेते यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दीनिमित्त सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने गेल्या वर्षभरात आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानमालेच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आनंदराव पाटील, डॉ. अतुल भोसले, प्रा. श्रीधर साळुंखे, मलकापूरच्या नगराध्यक्षा नूरजहाँ मूल्ला, उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, राहुल चव्हाण यांची उपस्थिती होती.
मधुकर भावे म्हणाले की, अमेरिकेत स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या विषयावर व्याख्याने झाली. त्या व्याख्यानाला मराठी माणसांनी आवर्जून उपस्थिती लावली. यशवंतराव चव्हाण ऐकायला अमेरिकेतही श्रोत्यांनी गर्दी केली. बेळगावात सीमाभागातही यशवंतरावांच्या जीवनपटावरील व्याख्यानाला गर्दी  झाली होती. तर चंद्रपूर, गडचिरोली या भागातील गोनपिंपरी या गावात सभागृह नसल्याने वडाच्या झाडाखाली झालेल्या व्याख्यानाला हजारोंच्या संख्येने गर्दी केली. त्यामुळे प्रत्येक भागातील माणसाला यशवंतराव जाणून घेण्याची मोठी ओढ असल्याचे दिसून येते असे त्यांनी सांगितले.
यशवंतराव चव्हाण यांनी १९६५ मध्ये हत्यारांची कमतरता असतानाही युध्द जिंकले. हत्यारे युध्द जिंकत नाहीत तर सैनिक युध्द जिंकतात, असा यशवंतरावांना आत्मविश्वास होता आणि तो खरा झाला. राष्ट्राची चळवळ करण्याची भावना त्यांनी लोकांमध्ये निर्माण केली. असा कर्तृत्ववान नेता या भूमीत जन्मला हे भाग्य आहे. यशवंतराव चव्हाण कोणताही निर्णय विचार करून घेत असत. सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेत ५० टक्के महिलांना संधी देण्यात आली आहे. महिलांच्या हातात सत्ता देण्याचे हे यश यशवंराव चव्हाण यांनी त्यावेळी अस्तित्वात आणलेल्या पंचायत राजचे यश आहे. नाहीतर ही बाब म्हणावी तशी सोपी नाही. लोकशाहीचा दिंडोरा पिटणाऱ्या अमेरिकेलाही हे शक्य झाले नाही, ते यशवंतरावांच्या पंचायतराजमुळे शक्य झाले आहे.  स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या ताकदीचे आणि त्यांच्याच भूमीतले पृथ्वीराज चव्हाण आज राज्याच्या मुख्यमंत्रिपदावर आहेत, हा योगायोग आहे, असे भावे म्हणाले.
आनंदराव पाटील यांचे भाषण झाले. कार्यक्रमाला स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी, काँग्रेस कार्यकर्ते तसेच नागरिक उपस्थित होते.