* इन्स्पायर कार्यशाळेचे उदघाटन

कुठल्याही क्षेत्रात यशस्वी व्हायचे असेल तर मुलभुत विषयांचे सखोल ज्ञान असायला हवे. पैसा हे सर्वस्व नाही याची जाणीव होऊ लागल्यानेच व्यावसायिक अभ्यासक्रम सोडून विद्यार्थी मुलभुत विषयांकडे वळू लागल्याचे निरीक्षण पुणे विद्यापीठाचे कुलगुरू वासुदेव गाडे यांनी आज टाकळीढोकेश्वर येथे बोलताना नोंदवले.
ढोकेश्वर महाविदयालयाच्या वतीने सलग दुसऱ्या वर्षी आयोजित केलेल्या पाच दिवशीय इन्स्पायर कार्यशाळेचे उदघाटन गाडे यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे उपाध्यक्ष नंदकुमार झावरे होते. माजी कुलगुरू अरूण अडसूळ, जिल्हा मराठाचे खजीनदार विश्वासराव आठरे, विश्वस्त दिपलक्ष्मी म्हसे व सिताराम खिलारी, प्राचार्य शिवाजीराव देवढे, कार्यशाळेचे समन्वयक डॉ. सहदेव आहेर आदी यावेळी उपस्थित होते.
गाडे म्हणाले, या भागातील विद्यार्थी दुष्काळी परिस्थिती तसेच आर्थिक अडचणींवर मात करून आपला दर्जा सिद्घ करीत आहेत, ही अतिशय महत्वाची बाब आहे. महाविद्यालयाच्या नियोजनामुळेच ही बाब शक्य झाली. स्वातंत्र्यापुर्वी व स्वातंत्रयानंतरही देशात उत्तम प्रकारचे संशोधन होत होते. भारतासारखे  उच्च शिक्षण जगाच्या पाठीवर कोठेही नव्हते. नंतरच्या काळात जगात उच्च शिक्षण सुरू झाले, भारतात मात्र त्याचा ऱ्हास झाला हे दुर्देव आहे. ज्या काळात देशाची आर्थिक स्थिती डबघाईची होती, त्याच काळात देशातील शास्त्रज्ञांनी नोबेल पारितोषके मिळविली. नंतरच्या काळात विज्ञानाची पाहिजे तेवढया वेगाने प्रगती झली नाही, किंबहुना त्याचा वेग फारच कमी झाल्याची खंत गाडे यांनी व्यक्त केली.
चांगल्या संशोधनासाठी सामुहीक प्रयत्नांची गरज असते व त्याची सवय विद्यार्थी दशेपासूनच लागली पाहिजे असे मत गाडे यांनी व्यक्त केला. ते म्हणाले, अनेक संशोधने अनेकांच्या प्रयत्नांमधून झाल्याचे आपण पाहिले आहे. संशोधनासाठी
गोडी असायला हवी, ती नसेल तर संशोधनास महत्व राहणार नाही. एखादी गोष्ट कठीण आहे असा विचार केला तर त्या विदयार्थ्यांचा
तेथेच पराभव होतो. त्यासाठी नकारात्मक
भुमिका बदलली पाहीजे असे गाडे
म्हणाले.
अरूण आडसूळ व नंदकुमार झावरे यांचीही यावेळी भाषणे झाली.