सर्वसामान्य प्रवाशांच्या फायद्याची सीव्हीएम कुपन्स १ एप्रिलपासून बंद केल्यानंतर प्रवाशांची गरसोय होत असल्याचा दावा केला जात असला, तरी प्रत्यक्षात या दाव्यात काहीच तथ्य नसल्याचे मध्य रेल्वेने जाहीर केलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. मध्य रेल्वेवर गेल्या तीन वर्षांत सीव्हीएम कुपन्सवरून खपलेल्या तिकिटांची टक्केवारी ३२.३८ वरून ५.०५ वर आली आहे. मध्य रेल्वेने सीव्हीएम कुपन्स हद्दपार करण्याच्या दृष्टीने चालवलेल्या प्रयत्नांची साथही या घसरत्या आकडेवारीला लागली आहे. मात्र सीव्हीएम कुपन्समुळे कमी झालेल्या तिकीट खिडक्यांवरील रांगा मात्र गेल्या दोन वर्षांत वाढल्या आहेत. पण सर्वसाधारणपणे प्रवाशांनी एटीव्हीएम आणि जेटीबीएस या दोन पर्यायांना पसंती दिल्याचे दिसते.
उपनगरीय रेल्वे प्रणालीत सुरू असलेली सीव्हीएम कुपन योजना ही रेल्वेसाठी आतबट्ट्याची ठरत असल्याचा दावा रेल्वेतर्फे केला जात आहे. अनेकांनी या कुपन्सच्या रंगीत छायांकित प्रती काढून त्या वापरण्यास सुरुवात केली होती. चित्रकलेच्या कागदावर काढलेल्या या रंगीत प्रति म्हणजे मूळ सीव्हीएम तिकिटाची सहीसही नक्कल असल्याने तिकीट तपासनीसांनाही ते ओळखणे कठीण होते. त्याचप्रमाणे एकच कुपन अनेकदा वापरणे, तिकीट तपासनीस समोर दिसल्याशिवाय कुपनच्या मागे योग्य माहिती न लिहिणे, असे अनेक गरप्रकार समोर आले होते. परिणामी रेल्वेला नुकसान सोसावे लागत होते. त्यामुळे रेल्वेने या १ एप्रिलपासून सीव्हीएम कुपन्स विकणे बंद केले असून पुढील महिन्यात या कुपन्सचा वापरही बंद केला जाणार आहे.
या निर्णयामुळे प्रवाशांना पुन्हा तिकीट खिडक्यांसमोर तासन्तास रांगेत उभे राहावे लागेल, असा सर्वसाधारण समज प्रवाशांमध्ये होता. मात्र २०११-१२ या वर्षांत ३२.३८ टक्के प्रवासी सीव्हीएम कुपन्सचा वापर करून तिकीट काढत होते. त्या वेळी तिकीट खिडक्यांवर उभे राहून तिकीट काढणाऱ्यांची संख्या ५६ टक्के एवढी होती. हीच टक्केवारी २०१४-१५ मध्ये अनुक्रमे ५.०५ आणि ५९.१७ एवढी आहे.
उपनगरीय प्रवाशांपकी जवळपास ८० टक्के प्रवासी मासिक अथवा त्रमासिक पासधारक आहेत. उर्वरित २० टक्के प्रवासी तिकीट काढून प्रवास करतात. यात मध्य रेल्वेवरील प्रवाशांची संख्या साधारण ८ ते दहा लाख एवढी आहे. या दहा लाख प्रवाशांपकी सध्या फक्त ५ टक्के प्रवासी म्हणजेच ५० हजार प्रवासीच सीव्हीएम कुपन्सचा वापर करत आहेत. उर्वरित प्रवाशांपकी सर्वाधिक म्हणजे ५.९० लाख प्रवासी आजही तिकीट खिडकीसमोर रांगेत उभे राहतात.सीव्हीएम कुपन्स हद्दपार झाली, तरीही प्रवाशांसाठी जेटीबीएस, एटीव्हीएम आणि आता मोबाइल तिकीट हे पर्याय उपलब्ध आहेत. कमीत कमी वेळ खर्च करून तिकीट प्राप्त करून देणाऱ्या या पर्यायांचा अवलंब प्रवाशांनी करावा, असे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांनी सांगितले.