येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारी ज्वारीचे दर थेट ४०० रुपयांपर्यंत कोसळल्याने संतप्त झालेल्या शेतक-यांनी लगेचच लिलाव बंद पाडले. बरेच वादंग होऊन अखेर १ हजार ५० रुपयांनी हे लिलाव सुरू झाल्यानंतरच व्यवहार सुरळीत झाले.
सोमवार हा येथील आठवडे बाजारचा दिवस आहे. या दिवशी येथे धान्याचे लिलाव होतात. यंदा तालुक्यात ज्वारीचे पीक मोठय़ा प्रमाणात आले आहे. तालुक्यात ज्वारीची सोंगणी होऊन शेतकरी अता माल बाजारात विकण्यासाठी आणू लागले आहेत. ही आवक वाढल्याने व्यापा-यांनी संगनमत करून ज्वारीचे बाजार पाडले असा आरोप सुदाम धांडे यांनी केला. ज्वारीलादेखील हमी भाव देण्याची मागणी त्यांनी केली. हमीभाव नसल्याने व्यापारी मनमानी भाव काढत आहेत. त्यातूनच सोमवारी येथे ४०० रूपयांपर्यंत ज्वारीचे दर कोसळले.
जिल्हा परिषद सदस्य प्रवीण घुले व दादासाहेब सोनमाळी यांनीदेखील ज्वारीला चांगला भाव देण्यासाठी व्यापा-यांना धारेवर धरले. त्यांनतर संस्थेच्या सभागृहात घुले, दादासाहेब सोनामाळी व व्यापा-यांच्या वतीने संचालक रवींद्र कोठारी, सुवालाल छाजेड, पप्पू नेवसे, धनंजय खाटेर यांनी चर्चा केली. या वेळी घुले यांनी शेतकरी व व्यापा-यांमध्ये समन्वय व विश्वासाचे वातावरण ठेवा, कोणाचेही नुकसान न करता लिलाव करा, त्यावरच तालुक्याची बाजारपेठ अवलंबून आहे असे खडसावल्यानंतर प्रतिक्विंटल १ हजार ५० रुपये दराने लिलावास सुरुवात झाली.