बाजार समित्यांमध्ये कृषी मालाच्या विक्री मूल्यावर शेतकऱ्यांकडून वसूल केली जाणारी आडत बंद करण्याचा पणन संचालकांच्या निर्णयाला राज्य शासनाने स्थगिती देण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त आल्यानंतर व्यापाऱ्यांनी आपले आंदोलन मागे घेतल्यामुळे जिल्ह्यातील काही बाजार समित्यांमध्ये दुपारच्या सत्रात लिलाव सुरू झाले. लासलगाव बाजार समितीसह काही ठिकाणी सकाळच्या सत्रात लिलाव झाले नाहीत. लिलाव बंद राहणार असल्याची माहिती नसल्याने अनेक ठिकाणी कृषी मालाची आवक झाली. परिणामी, लिलावासाठी शेतकऱ्यांना दुपापर्यंत ताटकळत रहावे लागले. सकाळच्या सत्रात लिलाव बंद राहिल्यामुळे कोटय़वधींच्या उलाढालीवर परिणाम झाला.
बाजार समितीमध्ये कृषी मालाच्या विक्रीवर शेतकऱ्यांकडून आडत वसूल केली जाते. कृषी मालानुसार आडतीचे दर आहेत. ही रक्कम शेतकऱ्यांकडून वसुल न करता व्यापाऱ्यांकडून करावी, असे निर्देश पणन संचालक डॉ. सुभाष माने यांनी परिपत्रकाद्वारे बाजार समित्यांना दिले आहेत. या निर्णयाविरोधात स्थानिक व्यापारी एकत्र आले आणि त्यांनी हा निर्णय रद्द होत नाही अथवा त्यास स्थगिती मिळत नाही तोपर्यंत २२ डिसेंबरपासून लिलावात सहभागी न होण्याचा इशारा जिल्ह्यातील व्यापारी संघटनांनी दिला होता. वास्तविक, पणन संचालकांच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना आडत देण्यापासून मुक्ती मिळणार होती. शेतीमालाच्या विक्रीवर होणाऱ्या खर्चात बचत होणार होती. बाजार समितीत शेतीमालाच्या खरेदी-विक्रीवर आडतदार तीन ते १० टक्क्यांदरम्यान आडत घेतात. त्यासाठी बाजार समित्यांकडून त्यांना परवानाही दिला जातो. नव्या निर्णयामुळे या रकमेचा बोजा आपल्यावर पडणार असल्याने व्यापाऱ्यांनी एकत्रित येऊन आंदोलनाचा मार्ग अनुसरला. आडत बंदीच्या निर्णयाविरोधात सोमवारपासून कोणत्याही प्रकारच्या शेतीमाल लिलावात सहभागी व्हायचे नाही असे व्यापाऱ्यांनी निश्चित केले. यामुळे लासलगावसह जिल्ह्यातील १५ बाजार समित्यांचे लिलाव बंद राहणार असल्याचे स्पष्ट झाले.
या घडामोडींची माहिती माजी मंत्री छगन भुजबळ यांनी पणन मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या समोर मांडली. लिलाव बंद पडल्यास शेतकरी भरडला जाईल हे लक्षात घेत शासनाला कोंडीत पकडण्याची तजविज व्यापारी वर्गाने केली होती. यामुळे पणन मंत्र्यांना शेतकऱ्यांकडून वसूल केली जाणारी आडत बंद करण्याच्या पणन संचालकांच्या निर्णयास स्थगिती देणे क्रमप्राप्त ठरले. या बाबतची माहिती वृत्तवाहिन्यांवर प्रसारीत झाल्यावर व्यापारी संघटनांनी आपला निर्णय मागे घेण्याची तयारी दर्शविली. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापाऱ्यांची सकाळी बैठक झाली. लिलाव बंदची कल्पना नसल्याने शेतकरी कृषीमाल विक्रीसाठी आले होते. पण, लिलाव बंद असल्याने पाहून त्यांनी ते पूर्ववत करण्याची मागणी केली. दरम्यानच्या काळात वृत्तवाहिनीवर त्या निर्णयास स्थगिती मिळाल्याचे समजल्यावर व्यापाऱ्यांनी लिलावात सहभाग घेतला. यामुळे लिलाव सुरू झाले अशी माहिती समितीच्या सूत्रांनी दिली.
लासलगावसह अन्य काही बाजार समित्यांमध्ये मात्र सकाळच्या सत्रात लिलाव होऊ शकले नाही. एकटय़ा लासलगाव बाजारात सकाळी १०० टेम्पो व टॅक्टर कांदा विक्रीला आला होता. पण, लिलाव होणार नसल्याने वाहनांना आतमध्ये प्रवेश करून देण्यात आला नाही. यामुळे लासलगाव-कोटमगाव रस्त्यावर शेकडो वाहने उभी होती. परंतु, सकाळच्या सत्रात शेतीमालाचा लिलाव झाला नाही. दुपारनंतर समितीत कांद्याचे लिलाव सुरू होणार असल्याचे सभापती नानासाहेब पाटील यांनी सांगितले. उर्वरित बाजार समित्यांमध्येही याप्रमाणे काहिशी संभ्रमावस्था होती. सकाळच्या सत्रात व्यापारी आपल्या निर्णयावर ठाम राहिले. परिणामी, अनेक ठिकाणी लिलाव झाले नाहीत. शेतीमाल घेऊन आलेल्या शेतकऱ्यांना तिष्ठत रहावे लागले. दुपारनंतर काही बाजार समित्यांमध्ये लिलाव सुरु झाले. या निर्णयास स्थगिती मिळाल्याने आता पूर्वीप्रमाणे शेतकऱ्यांना अडत द्यावी लागणार आहे. पालेभाज्या, फळभाज्या, रताळे व तत्सम शेतीमालासाठी प्रत्येकी ६ टक्के, कांदा व बटाटासाठी प्रत्येकी ६ टक्के, वरई, भात, नागली, गहूसाठी प्रत्येकी तीन टक्के, कांदा व भुईमुगसाठी ४ टक्के आडत घेतली जाते. आता ही रक्कम शेतकऱ्यांकडून घेतली जाणार आहे.
निर्णय घेतला, पण..
पणन मंडळाचे संचालक डॉ. माने यांनी आडत बंद करण्याच्या निर्णयाबरोबरच सर्व जिल्हा उपनिबंधक व बाजार समिती कार्यालयांना शेतीमालाचे वजन माप इलेक्ट्रॉनिक्सचा वजन काटा वापरून होत असल्याने तोलाई आकारू नये असे आणखी एक परिपत्रक काढल्याचे सांगितले जाते. डॉ. माने हे येत्या ३१ डिसेंबर रोजी निवृत्त होत असल्याचे सांगितले जाते. तत्पुर्वी, ही दोन परिपत्रके जारी करून त्यांनी शेतकरी वर्गाची अडतीच्या नावाखाली होणारी करोडो रुपयांची लूट थांबविण्यासाठी धाडसी पाऊल उचलले होते. तथापि, व्यापारी वर्गाचा कडाडून विरोध झाल्यामुळे शासनाला माघार घ्यावी लागल्याचे दिसत आहे.
कांदा सरासरी १६९० रुपये
लासलगाव बाजार समितीत सोमवारी दुपारी तीनला लिलाव सुरू झाले. ३५० वाहनात आलेल्या कांद्याला किमान ११८८ तर कमाल १८८८ रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला. सरासरी भाव १६९० रुपये होते.