अभिनयातील व्यक्तिरेखेवर रसिक किती प्रेम करतात यावर त्या कलाकाराचे यश अवलंबून असते. अभिनय ही मिरवण्याची गोष्ट नाही. ती एक जबाबदारी आहे आणि आव्हान आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेत्री व दिग्दर्शिका मृणाल कुलकर्णी यांनी येथे केले.
चतुरंग प्रतिष्ठानच्या ‘एक कलाकार एक संध्याकाळ’ कार्यक्रमात रसिकांनी मृणाल कुलकर्णी यांना अभिनय क्षेत्रातील विविध अंगांनी प्रश्न विचारले. त्या वेळी त्या बोलत होत्या.
कलाकाराच्या सोज्वळ चेहऱ्यापेक्षा त्याच्या अभिनयातील व्यक्तिरेखेवर रसिक किती प्रेम करतो ही त्या कलाकाराची खरी कसोटी असते. अभिनय म्हणून कस पाहायचा असेल तर विविध भूमिका कलाकाराने साकारल्या पाहिजेत. भूमिकेतून आव्हाने स्वीकारल्यानंतर तो कलाकार खऱ्या कसोटीला उतरत असतो आणि तेच यश त्याला यशाच्या शिखराकडे नेत असते, असे मृणाल कुलकर्णी यांनी सांगितले. २० वर्षे आपण अभिनय क्षेत्रात आहोत. माहेर-सासरहून आपणास कलेचा वारसा मिळाला तो आपण जपला. प्रेम विषयावर आपण पहिलाच चित्रपट दिग्दर्शित केला आहे. रोपाला जगविण्यासाठी हवा, पाणी, ऊन गरजेचे असते त्याप्रमाणे कौटुंबिक नात्याची गरज असते, असे रसिकांच्या प्रश्नांना उत्तरे देताना मृणाल कुलकर्णी यांनी सांगितले.