पंधरवडय़ापूर्वी पार पडलेल्या पहिल्या भटके विमुक्त साहित्य संस्कृती संमेलनाचा हिशेब रविवारी जाहीर करण्यात आला. संमेलनासाठी २ लाख ९३ हजार इतकी रक्कम जमा झाली होती. खर्च वजा जाता ५९ हजार रुपयांची रक्कम शिल्लक राहिली असून ती भटक्यांच्या विकासासाठी व चळवळीसाठी खर्च करण्यात येणार असल्याची माहिती भटके विमुक्त विकास मंचचे सचिव धनाजी गुरव यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली.
येथील भाई माधवराव विद्यापीठ येथे झालेल्या पत्रकार परिषदेत गुरव म्हणाले, पहिले भटके विमुक्त साहित्य संमेलन करवीरनगरीत यशस्वीरीत्या पार पडले. भटक्या समाजाच्या विकासासाठी व त्यांची संस्कृती जतन व्हावी या हेतूने संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. फुले, शाहू, आंबेडकर विचारप्रेमींनी संमेलनात मोठा सहभाग घेऊन आर्थिक मदतही केली. साहित्य संमेलन पार पडले तरी त्याचा हिशोब मात्र वादग्रस्त ठरत असतो. या पाश्र्वभूमीवर भटके विमुक्त विकास मंचने आयोजित केलेल्या या संमेलनाचा कारभार पारदर्शक असावा व त्याची माहिती जनतेपर्यंत पोहोचावी या हेतूने लगेचच जमा खर्च जाहीर केला जात आहे.    
या संमेलनासाठी २ लाख ९३ हजार रुपये इतका निधी जमा झाला होता. त्यापैकी २ लाख ३४ हजार रुपये खर्च झाले. ६५ हजार रुपये प्रवास, २० हजार रुपये छपाई, भोजन ८० हजार, स्मरणिका ४० हजार, मंच व सजावट या घटकासाठी सात हजार खर्च झाले आहेत. हे सर्व व्यवहार बँक खात्याव्दारे करण्यात आले आहेत. संमेलनात सहभागी झालेल्या वक्तयांना मानधन देण्यात आलेले नाही. यावेळी स्वागताध्यक्ष व्यंकापा भोसले, महेश भोसले, रघुनाथ कांबळे, गणेश काळे, सुरेश चव्हाण आदी उपस्थित होते.