टोलला विरोध दर्शविण्यासाठी मनसेच्या कार्यकर्त्यांनी सुरू केलेला रास्ता रोको पोलिसांनी दहा मिनिटांत गुंडाळला खरा; पण मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या अटकेच्या वृत्ताने शहराच्या विविध भागात मनसैनिकांनी ९ एस. टी. बस, तसेच एका मालमोटारीवर दगडफेक केली. मोर्चादरम्यान व दगडफेक करणाऱ्या ११८ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. ग्रामीण भागात कोठेही अनुचित प्रकार घडला नाही. मात्र, पोलिसांनी ४९० जणांना ताब्यात घेतले.
सकाळी पठण रस्त्यावरील महानुभाव आश्रमाजवळ मनसैनिक रास्ता रोकोसाठी जमले. शहराध्यक्ष सुमीत खांबेकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांना पोलिसांनी फार वेळ रास्ता रोको करू दिला नाही. सहायक पोलीस आयुक्त मेघराजानी यांनी जमावबंदी असल्याने सर्व कार्यकर्त्यांच्या अटकेचे आदेश दिले. दरम्यान या चौकात वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होऊ नये, याची खबरदारीही पोलिसांनी घेतली होती. बहुतांश वाहतुकीस पर्यायी मार्ग दिले होते. मात्र, जड वाहने थांबल्याने वाहतुकीची काही वेळ कोंडी झाली.
कार्यकर्त्यांना अटक होत असतानाच राज ठाकरेंना अटक केल्याचे वृत्त आल्याने कार्यकत्रे चिडले. त्यांनी शहर बसवर दगडफेक केली. रामगिरी चौक, तापडिया चौक, देवप्रिया, काíतकी, रंगीन दरवाजा, चुन्नीलाल पेट्रोल पंप व शहरातील अंबा-अप्सरा चित्रपटगृहासमोर बसवर दगडफेक करण्यात आली. दलालवाडी येथे काही कार्यकर्त्यांनी टायरला आग लावून वाहतुकीस अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी लगेच आग विझवली. सिडको, हायकोर्ट परिसरातही दगडफेकीचे किरकोळ प्रकार झाले. या प्रकारामुळे शहर बससेवा दुपारी काही वेळ बंदच होती.