वाहन उद्योगाशी निगडित असलेले ‘ऑटो २०१२’ हे प्रदर्शन बुधवारपासून पुण्यातील गोळीबार मैदान येथे सुरू झाले. देश व विदेशातील वाहने व वाहनांशी संबंधित असलेल्या उत्पादकांचा मोठा सहभाग असलेले हे प्रदर्शन २३ डिसेंबपर्यंत सकाळी १० ते रात्री ८ खुले राहणार आहे.
या प्रदर्शनामध्ये प्रवासी वाहने, दोन व तीन चाकी स्वयंचलित वाहने, सुटे भाग, दुरुस्ती यंत्रणा, टायर्स आणि टय़ूब्ज, चार चाकी गाडय़ांची संरक्षण व्यवस्था यांसारखे सुमारे ८० स्टॉल्स आहेत. भारतीय संरक्षण खात्याच्या विभागात रणगाडे, लष्करी वाहने, त्यांचे सुटे भाग असलेल्या स्टॉलचाही समावेश या प्रदर्शनात आहे. पुण्याच्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या विशेष दालनात विद्यार्थ्यांंनी बनवलेली वाहने व नवीन संशोधने मांडली आहेत. तसेच ‘वाहतूक समस्या व उपाय’ या विषयावर २२ डिसेंबर रोजी दुपारी २.३० वाजता कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने एस.टी व पीएमपीएमएलच्या वाहन चालकांचा सत्कार करण्यात येणार आहे.
या प्रदर्शनाचे उद्घाटन भारतीय सेनेच्या ईएमई विभागाचे अध्यक्ष लेफ्टनंट जनरल एन. बी. सिंग यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आले. यावेळी मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अ‍ॅन्ड अ‍ॅग्रीकल्चरचे अध्यक्ष एस. के. जैन, पुणे परिवहन महामंडळाचे अध्यक्ष व कार्यकारी संचालक आर. एन. जोशी उपस्थित होते.