निसर्गाचे संतुलन कायम ठेवून विकासाकडे वाटचाल
‘अॅडव्हांटेज विदर्भ’
विदर्भात ऑटो मोबाईल हब, टेक्सटाईल इंडस्ट्रीज उभारण्याची सरकारची योजना आहे. ऑटो मोबाईल हबचा विदर्भाला मोठा अॅडव्हांटेज आहे. विदर्भ निसर्गाचे संतुलन कायम ठेवून विकासाच्या दिशेने वाटचाल करीत आहे, ही फारच समाधानाची बाब आहे, असे मत ऑटोमोबाईल क्षेत्रातील ज्येष्ठ उद्योजक अविनाश भुते यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केले.
नागपूर हे भारतातील सर्वात सुरक्षित ‘रेशिडेंशियल झोन’ आहे. हे देशाला जोडणारे शहर आहे. मध्यवर्ती ठिकाणी असल्याने उत्पादित माल संपूर्ण देशात पोहोचविणे सोयीचे आहे. यासाठी वाहतूक खर्चात मोठी बचत होणार आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक असलेले सर्व निकष येथे आहेत. गुन्हेगारी, दहशतवाद, पूर, वादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीपासून धोका नसल्याने उद्योजकांना ही एक पर्वनीच आहे. शिवाय कामगार, वीज, पाणी, जमीन या मूलभूत बाबीही येथे स्वस्तात आणि पुरेशा प्रमाणात उपलब्ध असल्याने उद्योगांसाठी फायद्याच्याच आहेत. दुचाकी वाहनांचा वापर करण्यामध्ये नागपूर हे देशातील पाचव्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. ऑटो मोबाईल हब झाल्यास याला जोडून विविध सुटे भाग निर्मितीचे जवळपास २०० लघु उद्योग सुरू होतील आणि लाखो लोकांना रोजगार मिळू शकेल. यातून विदर्भाच्या विकासाला चालना मिळेल. संपूर्ण जनतेला याचा मोठा फायदा होईल. सध्या नागपुरात मिहान शिवाय दुसरे काही नाही. गुजरातचेही काही वर्षांपूर्वी असेच होते. अलीकडील काळात गुजरातने वेगाने विकास केला, त्याच वेगाने विदर्भाचाही विकास होऊ शकतो आणि काही वर्षांनंतर विकासात विदर्भ गुजरातलाही मागे टाकू शकेल, पण यासाठी विदर्भवासीयांची मानसिकता बदलण्याची गरज आहे, असे भुते म्हणाले. विकासासोबत लोकांना निसर्गाचीही ओढ वाढत आहे. विदर्भ साधन संपत्तीने संपन्न आहे. मोठय़ा प्रमाणात जंगल असल्याने हे पर्यटनाचे एक केंद्रही बनले आहे. नागपूरपासून पेंच, चिखलदरा, ताडोबा, पचमढी, कान्हा यासह विविध पर्यटनस्थळे जवळ आहेत. ही बाबही उद्योजकांच्या लक्षात येत आहे. निसर्गाचे संतुलन कायम ठेवून या ग्रीन सिटीची विकासाकडे वाटचाल सुरू आहे. टप्प्याटप्प्याने विकास सुरू असला तरी येत्या पाच वर्षांत विदर्भाच्या विकासाचे चित्र अधिक स्पष्ट होईल. नागपूरचे आपण रहिवासी आहोत, याचा प्रत्येकालाच अभिमान वाटावा, अशी स्थिती आहे. ‘अॅडव्हांटेज विदर्भ’च्या निमित्ताने सरकारने विदर्भाच्या विकासाकडे लक्ष केंद्रित केले आहे, याकडे एक सकारात्मक बाब म्हणून बघायला हवे आणि विकासात सर्वानी हातभार लावावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. विदर्भात कापसाचे उत्पादन राज्यात सर्वाधिक होते. नागपुरात टेक्सटाईल इंडस्ट्री उभारण्याची सरकारची योजना आहे. संत्र्यावर प्रक्रिया करणारे उद्योगही सुरू होतील. उद्योगांमुळे शेतक ऱ्यांना त्यांचा माल स्थानिक बाजारपेठेत चांगल्या भावात विकता येईल, यामुळे शेतक ऱ्यांना मोठा फायदा होईल. विदर्भातील सोयींचा विचार करून ‘अॅडव्हांटेज विदर्भ’मध्ये उद्योजक मोठय़ा संख्येने सहभागी होतील आणि विदर्भाच्या विकासाला चालना मिळेल, असे भुते म्हणाले.