कामोठे वसाहतीत एनएमएमटी बस सेवा सुरू झाल्याने नागरिकांचा प्रवास सुखकर झाला आहे. या सेवेला रिक्षाचालकांचा विरोध असल्याने कोणताही अनुचित प्रकर घडू नये यासाठी प्रत्येक बसमध्ये शस्त्र पोलीस नेमण्यात आले आहे. या सेवेमुळे स्थानिक रिक्षाचालकांच्या पोटावर पाय आल्याचा बागुलबुवा करण्यात येत आहे. यातूनच संतप्त झालेल्या एका रिक्षाचालकाने सोमवारी रात्री बसमध्ये नेमणूक असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केली असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
कामोठे वसाहतीमध्ये एनएमएमटी बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा आकडा सोमवारी एका दिवसात साडेबारा हजारांवर जाऊन पोहचला. पाच दिवसांत दोन लाखांची कमाई व तब्बल ३५ हजार प्रवाशांना या बससेवेचा फायदा मिळाल्याने प्रवासी पोलिसांच्या भूमिकेमुळे बिनधास्त झाले आहेत. सोमवारी रात्री कामोठे पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक अमोल कर्डीले यांच्यासोबत रिक्षाचालकांनी रेल्वेस्थानक परिसरात दादागिरी करून कर्डीले यांना मारहाण केली. कर्डीले यांना मारहाण करणाऱ्या संबंधित रिक्षाचालकाचे नाव पोलिसांना समजू शकले नाही. त्या रिक्षाचालकासोबत इतर १५ रिक्षाचालकांचा जमाव तेथे उपस्थित होता. पोलीस या सर्वाचा शोध घेत आहेत.
पोलिसांविरोधात रिक्षाचालकांनी पुकारलेल्या एल्गारामुळे पोलिसांची मोठी कुमक मानसरोवर स्थानक परिसरात तैनात होती. पोलिसांचा आक्रमक पवित्रा पाहून अखेर रिक्षाचालकांनी आपल्या रिक्षा नेहमीप्रमाणे काही वेळेसाठी बंद ठेवल्या होत्या. मात्र रिक्षा बंद ठेवल्याने सर्वच प्रवासी बसमधून प्रवास करू लागल्याचे पाहून पुन्हा रिक्षाचालकांनी रिक्षा सुरू केल्या. अखेरच्या रेल्वेपर्यंत एनएमएमटी बस सुरू असल्याने तिचा फायदा प्रवाशांना मिळाला.
कामोठे बससेवा कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नाही. तसेच बससेवा सुरू झाल्यामुळे रिक्षाचालकांची उपासमार होईल हा गैरसमज पसरवला जात आहे. ज्या प्रवाशांना बसची प्रतीक्षा करायची सवय नाही ते प्रवासी रिक्षानेच प्रवास करत आहेत. बससेवेमुळे पायी चालणाऱ्या प्रवाशांना स्वस्तामध्ये घरापर्यंत जाता येत आहे. जनहिताची ही बससेवा पोलीस बंद होऊ देणार नाहीत. कामोठेवासीयांच्या सोयीसाठी ही बससेवा आहे. कायद्याचा सन्मान न करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. पोलिसांवर हल्ला करणाऱ्या रिक्षाचालकांना लवकरच पोलीस पकडतील अशी माहिती कामोठे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम मुल्लेमवार यांनी दिली आहे.