शहरात अनधिकृतपणे चालविल्या जाणाऱ्या हजारो रिक्षा, त्यातील निम्म्या रिक्षांचे मालक पोलीस दलातील कर्मचारी, क्षमतेहून अधिक वाहतूक करून प्रवाशांची मनमानीपणे होणारी लुबाडणूक, रिक्षा चालक-मालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची दादागिरी यामुळे नाशिकचा रिक्षा व्यवसाय कलंकित झाल्याकडे प्रामाणिक रिक्षा चालकांनी लक्ष वेधल्यावर नियमांचा अव्हेर करणाऱ्या रिक्षा चालकांची दादागिरी सहन करणारे सर्वसामान्य प्रवासी पुढे आले आहेत. प्रामाणिक रिक्षा चालकांनी उपस्थित केलेल्या मुद्यांचे स्वागत करतानाच ही भयावह परिस्थिती सुधारण्यासाठी पोलीस यंत्रणेने पुढाकार घ्यावा अशी त्यांची अपेक्षा आहे. या संदर्भात स्वानुभूती डॉ. शशांक कुलकर्णी यांनी मांडली आहे

नाशिकमधील अवैध रिक्षा चालकांच्या मुजोरीची बातमी वाचली. अधिकृत आणि प्रामाणिक चालकांनीच याविषयी आवाज उठवलेला वाचून आनंद झाला. अर्थात या चालकांनी याचा सातत्याने पाठपुरावा केला तरच यात काही सुधारणा होईल. शिवाय त्यांच्या व्यवसायात देखील वृध्दीच होईल यात शंका नाही. एक सामान्य नागरीक म्हणून रिक्षाने जाण्याचा मला किंवा कुटुंबियांना नेहमीच प्रसंग येतो. परंतु, प्रत्येकवेळी मनस्तापाखेरीज हा प्रवास शक्य नाही हे आता अनुभवाने माहीत झाले आहे. बऱ्याच वेळेस खडागंजी करून पाहिली, रस्त्यामध्येच उतरून पाहिले, रिक्षाच्या पाठीमागे लिहिलेला क्रमांक फिरवून पाहिला, पोलिसांकडेही तक्रारी देऊन पाहिल्या, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांबरोबर अनौपचारीक चर्चेत मुद्दा उपस्थित करुन पाहिला, पण कोणतीच सुधारणा दृष्टीपथास देखील नाही. अर्थात बातमीत उल्लेख असल्याप्रमाणे पोलीस विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्याच रिक्षा अनधिकृतपणे शहरात धावत असतील तर दगडावर कितीही डोके आपटले तरी आपणच रक्तबंबाळ होणार हे निश्चित. कित्येक वेळेस ‘बाबा रे, दोन माणसांचे पैसे देतो, पण मागे तीन प्रवासीच घे’ अशी काकुळतीला येऊन विनंती केल्यावर देखील चालक ऐकत नाही. मागे नाही ना, मग पुढे तीन माणसे बसवतो. जास्त आवाज केला तर मध्येच उतरून देतो. बर एवढय़ा गोष्टींसाठी पोलिसांकडे जाणे शक्य नसते. शिवाय, पोलीस वेडय़ा त काढतात ही गोष्ट वेगळीच. रिक्षाच्या मागे लिहिलेला क्रमांक कायम व्यस्त असतो (सोयीस्कर ?) मीटरने प्रवास करणे तर आम्ही लोक पूर्ण विसरून गेलेलो आहोत. गणवेश नसणे, बिल्ला नसणे, चालकाचे छायाचित्र मागील भागात असणे या गोष्टी नियमात असतात का, असा प्रश्न पडतो. ७-८ प्रवासी दामटून बसवणे, कानठळ्या बसतील अशा आवाजात गाणी लावणे, उध्दट उत्तरे देणे, चौकाचौकातून रहदारीला अडथळा होईल अशा रिक्षा अस्ताव्यस्त लावणे ही सध्याची कार्यपध्दती आहे. रिक्षा थांब्यावर ‘बाऊन्सर्स’ सारखी दिसणारी माणसे दिसली की सामान्य माणसाची आधीच धडकी भरलेली असते. स्त्रिया आणि वृध्दांची तर कशी अवस्था असेल याची कल्पनाच न केलेली बरी.
मध्यंतरी मोटारीने वडाळा रस्त्यावरून येत होतो. आपल्या मोटारीचा वेग ३० पेक्षा जास्त असणे शक्यच नव्हते. अचानक उजव्या बाजुने ५-६ प्रवासी अधिक चालक अशी रिक्षा प्रचंड वेगात येते आणि माझ्या पुढे भर रस्त्यात थांबते, तेही दुसऱ्या रिक्षाचालक मित्राशी गप्पा मारायला. मी अक्षरश धडकी भरून गाडी थांबवितो, फक्त काही अंतरावर कसा तरी ओव्हरटेक करून एक रागाची खूण करतो तर रिक्षा चालकाने जवळजवळ दोन किलोमीटपर्यंत पाठलाग केला. समांतर रिक्षा चालवून मोटारीवर धपाटे मारून दहशत घातली. रिक्षातील प्रवाशांचा जीव धोक्यात टाकला. म्हणजे घरी पोहोचेपर्यंत आपलाच जीव आपल्यात नसतो आणि जीव वाचला म्हणून मी स्वत:ला धन्य समजतो. कित्येक दिवस ही घटना आपल्या मनात घर करून राहिली की काय चालले आहे या शहरात. याला कारण कायद्याचा कोणताही धाक राहिलेला नाही हे आहे. आपण तसेच पोलिसांकडे गेलो असतो तर काहीच घडलेले नसल्यामुळे मलाच मुर्खात काढले असते. म्हणजे पोलिसांच्या दृष्टीने आपण आधी तुडवून घेतले असते तरच दखलपात्र गुन्हा झाला असता. शिवाय, संघटनेच्या अध्यक्षांचा फोन गेल्यावर आपल्या तक्रारीची काय वासलात लागेल हे वेगळे सांगायला नकोच.
यावर उपाय म्हणजे सुज्ञ, नियम पाळणाऱ्या प्रामाणिक रिक्षा चालकांनी पुढाकार घेतला पाहिजे. नवीन अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा फायदा करून घेतला पाहिजे, ऑनलाईन रिक्षा आरक्षित करता आली पाहिजे. त्यासाठी सहकाराचा मार्ग उपयोगी आहे. आता सर्वाकडे भ्रमणध्वनी असतोच असतो.
प्रवाशांनीही त्याचा अधिकाधिक वापर करून या अनधिकृत रिक्षा वाल्यांना धडा शिकविला पाहिजे. शेअर रिक्षाचे दर वेळोवेळी जाहीर करावेत. या सहकारी तत्वाचा सामाजिक माध्यमांवर प्रसार केला पाहिजे. त्याची जाहिरात केली पाहिजे. पोलिसांच्या वाहतूक विभागानेही त्यात सक्रिय सहभाग घेतला पाहिजे. मुख्यमंत्री महोदयांकडे गृहखाते असल्याने सामान्य नाशिककराची कैफियत जाणून त्यांनी या भयंकर परिस्थितीत काडी इतकी तरी सुधारणा करावी ही अपेक्षा.