प्रादेशिक परिवहन विभाग आणि वाहतूक पोलिसांच्या कारवाईच्या निषेधार्थ शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांनी शुक्रवारी पुकारलेल्या संपात विद्यार्थ्यांसह पालक वर्ग भरडला गेला. या वाहनधारकांचे नेतृत्व करणारे राष्ट्रवादीचे पदाधिकारी सुनील बागूल यांनी आदल्या दिवशी बंद होणार नसल्याचा निर्वाळा देऊन दुसऱ्या दिवशी मात्र कोलांटउडी मारली. सत्ताधाऱ्यांना घरचा अहेर देणाऱ्या बागूल यांना पक्षापेक्षा श्रमिक सेना संघटना महत्वाची वाटली. नियमांचे पालन न करता होणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांच्या वाहतुकीविरोधातील कारवाई थांबविण्यासाठी संपाद्वारे वाहनधारकांनी दबाव टाकला. या अनुषंगाने झालेल्या बैठकीत बाजारातील इलेक्ट्रॉनिक रिक्षा मीटरच्या टंचाईचा मुद्दा मांडून कारवाई थांबविण्याची मागणी करण्यात आली. प्रादेशिक परिवहन विभागाचे प्रमुख जीवन बनसोड यांनी नियमांचे पालन न करणाऱ्या वाहनधारकांविरोधात कारवाई सुरूच राहणार असल्याचे सुतोवाच केले असले तरी श्रमिक सेनेने मात्र या कारवाईत शिथिलता येणार असल्याचा दावा केला आहे.
सिडको येथील एका शाळेत बाल गटात शिक्षण घेणारा सारंग जाधव या चार वर्षीय बालकाचा शालेय बसचा धक्का लागून मृत्यू झाल्यानंतर वाहतूक पोलीस आणि प्रादेशिक परिवहन विभागाला अचानक जाग आली. नियमांचे पालन न करता विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांविरोधात या विभागांनी धडक तपासणी मोहीम सुरू केली. त्या अंतर्गत प्रारंभी शालेय बस आणि नंतर सर्वच वाहनांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईने धास्तावलेल्या वाहनधारकांनी ही मोहीम हाणून पाडण्यासाठी नेहमीप्रमाणे शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक सलग दोन दिवस बंद ठेवण्याचा पवित्रा घेतला. या निर्णयाचा फटका पालक व विद्यार्थ्यांना सहन करावा लागला. शहरात रिक्षा, मारूती व्हॅन व तत्सम वाहनांद्वारे शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक केली जाते. ही वाहने येणार नसल्याने पाल्यांना शाळेत सोडण्यासाठी पालकांना कसरत करावी लागली. ज्यांची अशी व्यवस्था झाली नाही, त्या विद्यार्थ्यांना सक्तीची सुट्टी घेणे भाग पडले. प्रत्येक शाळेतील जवळपास निम्मे विद्यार्थी रिक्षा व तत्सम वाहनांद्वारे ये-जा करतात. यातील बहुतांश विद्यार्थ्यांना शुक्रवारी पालकांच्या वाहनांवरून शाळा गाठावी लागली.
शाळांच्या प्रवेशद्वारासमोर पालकांच्या शेकडो मोटारी येऊन धडकल्याने वाहतुकीची चांगलीच कोंडी झाली. शालेय वाहतुकदारांचे नेतृत्व श्रमिक सेना करत आहे. या संघटनेच्या नेतृत्वाखाली वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेतला गेला. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुनील बागूल यांनी आदल्या दिवशी राष्ट्रवादीप्रणित श्रमिक रिक्षा चालक-मालक संघटना बंदमध्ये सहभागी होणार नसल्याचे म्हटले होते. तथापि, दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी संघटनेने घुमजाव केल्याचे स्पष्ट झाले.
शहरात दबदबा असणारी ही संघटना संपात उतरल्याने बहुतांश शाळांमधील शालेय विद्यार्थी वाहतूक पुरती कोलमडली. काही अपवादात्मक रिक्षा वगळता बहुतांश शाळांमध्ये रिक्षा, व्हॅन वा इतर वाहनांद्वारे विद्यार्थ्यांची वाहतूक झाली नाही. दुपारी चालक-मालक संघटनेचे प्रतिनिधी आणि प्रादेशिक परिवहन अधिकारी यांची संयुक्त बैठक झाली. श्रमिक सेनेचे बागूल यांनी प्रादेशिक परिवहन अधिकारी जीवन बनसोड यांच्याशी चर्चा केली. शहरात इलेक्ट्रॉनिक मिटरचा प्रचंड तुटवडा असून ते उपलब्ध होत नसताना वाहनधारकांवर कारवाई केली जात असल्याची बाब बागूल यांनी मांडली. मिटर उपलब्ध करून दिल्यावर कारवाई करावी असे त्यांनी सांगितले. विद्यार्थी वाहतुकीसाठी शाळेचे ना हरकत प्रमाणपत्र घेण्याची सक्ती करू नये, ८०० सीसी वाहनांना विद्यार्थी वाहतुकीस परवानगी द्यावी, आदी मागण्याही मांडण्यात आल्या. स्थानिक पातळीवर मागण्यांवर सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन प्रादेशिक परिवहन विभागाने दिले असले तरी बागूल यांनी बहुतांश मागण्या मान्य झाल्याचा दावा करत रिक्षाचालकांविरोधातील कारवाईत शिथिलता येणार असल्याचे ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. तथापि, प्रादेशिक परिवहन अधिकारी जीवन बनसोड यांनी त्याचा इन्कार करत कारवाई नेहेमीप्रमाणे सुरू राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

बंदची पूर्वकल्पना नसल्याने धावपळ
शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांनी कोणत्या कारणावरून बंद पुकारला याची कल्पना नाही. वाहनचालकांनी कोणतीही पूर्वकल्पना दिली नाही. वाहनचालकाने या विषयी कुठल्याच प्रकारची सूचना दिली नाही. त्यामुळे मुलाला वेळेत शाळेत पोहचविताना कमालीचा गोंधळ उडाला. दुपारी वडिलांनी पाल्यास घरी आणून सोडले. वाहनधारक नियमांचे पालन करत नाहीत. विद्यार्थ्यांंची सुरक्षितता हा त्यांच्या लेखी गौण विषय असतो. केवळ एक रिक्षा अथवा व्हॅनमध्ये किती विद्यार्थी कोंबले म्हणजे आपला फायदा जास्त होईल याकडे त्यांचे लक्ष असते. त्याबद्दल विचारणा केल्यास मग तुमचे तुम्ही पाहुन घ्या, असा सल्ला देऊन ही मंडळी मोकळी होतात. बस वाहतुकीचा पर्याय निवडला तरी पालकांची वेगळ्या प्रकारे अडवणूक सुरू राहते. शालेय विद्यार्थ्यांच्या अपघाती मृत्यूनंतर प्रादेशिक परिवहन विभाग मोहीम राबवित असताना शालेय व्यवस्थापन त्या दृष्टिकोनातून काय करत आहे ?
– सोनल बच्छाव
ओढाताण झाली.
आम्ही दोघे नोकरदार असल्याने मुलांची शाळेत ने आण करण्यासाठी खासगी वाहनांचा पर्याय निवडला आहे. बंद बाबत कुठल्याच प्रकारची सूचना न केल्याने सकाळी खुप धावपळ झाली. वाहनचालकाला दुरध्वनी केल्यावर आम्हाला कळाले की आज बंद आहे. पत्नीने कामावर जाण्यापूर्वी वेळ काढुन शाळेत सोडले तर मोठय़ा मुलाने शाळेत जाण्यासाठी सायकलचा पर्याय निवडला. एक तर विद्यार्थी वाहतूक करणारे वाहन चालक नियमांचे पालन करत नाही. दुसरीकडे त्यांच्या चुकांसाठी साऱ्यांनाच वेठीस धरले जाते. वाहनधारकांच्या कार्यशैलीत विद्यार्थी नेहमी भरडला जातो. शिवाय पालकांची ओढाताण होते ती वेगळीच.
– विशाल भणगे
पाल्य सुरक्षित घरी येईल याची खात्री नाही..
वर्षांकाठी शालेय वाहतुकीत एक -दोन चिमुरडय़ांचा जीव जातो. त्या अपघातापुरता काही दिवसांसाठी माध्यमांना विषय मिळतो. वाहतूक शाखेला मोहीम राबविण्यास निमित्त मिळते. पण, या प्रश्नावर कायमस्वरूपी काहीच तोडगा निघत नाही. पालक धावपळ कमी करण्यासाठी शालेय बस वाहतूक करण्यासाठी अन्य पर्याय निवडतो. मात्र त्या माध्यमातून आपले पाल्य सुरक्षित घरी येईल, याची शाश्वती नसते. अनेकदा वाहनधारक इंधन दरवाढीमुळे गॅसचा वाहनांमध्ये सर्रास वापर करतात. पण सुरक्षेच्यादृष्टीने उपाययोजना नसते. या वाहनांमध्ये चित्रविचित्र गाणी लावली जातात. त्याचा विद्यार्थ्यांच्या मनावर काय परिणाम होईल? याबाबत काही जागरूक पालकांनी बोलण्याचा प्रयत्न केला तर दुसरे कोणी बघुन घ्या, असे उत्तरे मिळते. क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी घेणे याविषयी कोणी ठोस भूमिका घेतलेली नाही.
– प्रज्ञा काकडे
‘शालेय बस वाहतूक सुरक्षित, पण.’
शाळेकडून पुरविण्यात येणारी बससेवा ही विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने पालकांसाठी खात्रीलायक उपाय आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना घराच्या पायरीपर्यंत सोडण्याची हमी असते. परंतु, वाहक व चालकांकडून त्यात अनेकदा चालढकल होते. मुळात मुलगा अथवा मुलगी बसमधून उतरल्यावर त्यांना पालकांच्या स्वाधीन करणे हे वाहकाचे काम असते. किती वाहनांमध्ये या पध्दतीने काम चालते?  शिवाय, शाळेच्या आवारात ज्या ठिकाणी बस थांबतात ती जागा अतिशय अरूंद असते. अशा ठिकाणी बसमध्ये बसण्यासाठी विद्यार्थी गर्दी करतात. वाहनचालकाला याचा अंदाज न आल्याने अनेकदा अपघात घडतात. या शिवाय, बसची स्वच्छता याकडेही लक्ष दिले पाहिजे. बसची आसन क्षमता आणि त्यात असणारी विद्यार्थी संख्या यावर उपाय शोधणे गरजेचे आहे.
– वैशाली शिरसाठ
नियमांचे पालन व्हावे
वाहनधारकांच्या बंदची पूर्वकल्पना नसल्यामुळे पाल्यांना शाळेत सोडविण्यासाठी खुप धावपळ उडाली. त्याचा परिणाम कामावर पोहोचण्यास विलंब होण्यात झाला. मात्र त्याला इलाज नाही. मुलांची शाळा बुडण्यापेक्षा स्वत: मुलांना सोडून देणे चांगले यासाठी हा पर्याय निवडला. जी कारवाई प्रादेशिक परिवहन आज राबवत आहे,
ती मोहीम शाळा सुरू झाल्यावर का राबविली गेली नाही? प्रत्येक पालकाने आपले पाल्य बसमधून सुरक्षित उतरत आहे की नाही, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांनी
किमान काही नियम पाळावेत, जेणेकरून त्यांच्या व विद्यार्थ्यांच्या जिवितास धोका पोहचणार नाही.
अश्विनी साताळकर

पालकांची तारेवरची कसरत
शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांनी अचानक पुकारलेल्या बंदमुळे पालकांना तारेवरची कसरत करावी लागली. शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक सुरक्षित राखण्यासाठी नियमांचे पालन करण्यास वाहनधारकांची तयारी नसते, रिक्षा वा व्हॅनमध्ये होणाऱ्या क्षमतेहून अधिक विद्यार्थ्यांंची वाहतूक अशा मुद्यांवर बोट ठेवतानाच काही पालकांनी शालेय बस वाहतूक सुरक्षित असून नियमांचे पालन सर्वाकडून होण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीच्या मुद्यावर पालकांनी व्यक्त केलेली ही मते.