जया दडकर लिखित ‘दादासाहेब फाळके-काळ आणि कर्तृत्व’ या चरित्रग्रंथातून दादासाहेब फाळके यांचे झपाटलेपण आपल्याला कळते. दडकर यांनी कल्पना आणि वास्तव यांचा मेळ घालून फाळके यांचे चरित्र आपल्यासमोर उभे करण्याचा प्रयत्न केला आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांनी येथे केले. मॅजेस्टिक प्रकाशनातर्फे दादर (पश्चिम) येथील धुरू सभागृहात नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या केशवराव कोठावळे पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते.
 राजदत्त यांच्या हस्ते दडकर यांना या ग्रंथासाठी २५ हजार रुपये रोख आणि सन्मानचिन्ह असे पारितोषिक प्रदान करण्यात आले. कोठावळे पारितोषिकाचे तिसावे वर्ष आणि ‘ललित’ मासिकाचा गेल्या वर्षी झालेला सुवर्ण महोत्सव या दोन्हीच्या निमित्ताने यंदा हे पारितोषिक विशेष स्वरूपात देण्यात आले. राजदत्त पुढे म्हणाले की, दादासाहेबांचा हा केवळ चरित्र ग्रंथ नाही तर त्यापेक्षा वेगळे काहीतरी आहे.
दादासाहेब हे काय रसायन होते हे समजण्यासाठी या पुस्तकात सुरुवातीला दोन स्तंभ दिले आहेत. हे चरित्र वाचताना आपण तेथे आहोत, ते अनुभवतो आहोत, असे वाटते. हे पुस्तक माझ्या वाचनात आले आणि मी श्रीमंत झालो.
पुस्तकाचे लेखक जया दडकर आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले, मला पुस्तके वाचण्याची खूप आवड होती. लेखकांबद्दल खूप आकर्षण होते. पण मी स्वत: लिहू शकेन असे वाटले नव्हते. माझ्या लेखनाचे सर्व श्रेय राम पटवर्धन, शिरीष पै, बाबूरा बागूल, चंद्रकांत खोत, नाना जोशी यांना आहे. निवड समितीच्यावतीने प्रतिभा कणेकर यांनी आपली भूमिका मांडली. अशोक कोठावळे यांनी प्रास्ताविक केले.