मुंबईच्या उपनगरीय गाडय़ांसाठी स्वयंचलित दरवाजांचा पर्याय अजिबात व्यवहार्य ठरणार नाही, असे ठाम मत रेल्वे बोर्डाचे सदस्य सुबोध जैन यांनी व्यक्त केले. मुंबईतील एकंदरीत गर्दी लक्षात घेता स्वयंचलित दरवाजे बसवल्यास अनेक समस्या उद्भवतील. त्यामुळे स्वयंचलित दरवाजे बसवणे तांत्रिकदृष्टय़ा शक्य असले, तरी ते व्यवहार्य नाही, असे ते म्हणाले. जैन यांनी व्यक्त केलेल्या या मतामुळे पश्चिम रेल्वेवरील वातानुकुलित गाडीबाबतही साशंकता निर्माण झाली आहे.
मध्य तसेच पश्चिम रेल्वेवर दर तासाला गर्दीच्या वेळी अंदाजे १८ गाडय़ा धावतात. यातील प्रत्येक गाडीतून हजारो प्रवासी प्रवास करतात.  स्वयंचलित दरवाजे बसवल्यास संपूर्ण गाडी त्यांच्या तंत्राप्रमाणे चालते. प्रत्येक डब्याचा प्रत्येक दरवाजा बंद झाल्याशिवाय गाडी स्थानकातून सुटू शकत नाही. तसेच सध्या फुटबोर्डावर उभे राहून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना या गाडीत जागा उपलब्ध होणार नाही. परिणामी दर तासाला सुटणाऱ्या गाडय़ा आणि दर गाडीतून जाणारे प्रवासी या दोघांमध्येही घट होणार आहे. मध्य किंवा पश्चिम रेल्वेवरील गर्दी पाहता हे परवडणारे नाही, असे जैन म्हणाले.
स्वयंचलित दरवाजे बसवण्यासाठीचे तंत्रज्ञान आपल्याकडे आहे. मात्र उन्नत रेल्वेमार्ग, भुयारी रेल्वे असे अनेक पर्याय उपलब्ध होऊन सध्याच्या प्रचलित मार्गावरील गर्दी कमी झाल्याशिवाय हे तंत्रज्ञान अमलात आणणे शक्य होणार नाही, असे त्यांनी सांगितले. पूर्व मुक्तमार्ग किंवा सी-लिंक वगैरे कितीही रस्ते बांधले, तरी ते रेल्वेमार्गाला पर्याय ठरू शकत नाहीत, असेही मत त्यांनी व्यक्त केले.
सुबोध जैन यांच्या या मताचा विचार करता पश्चिम रेल्वेने केलेली वातानुकुलित गाडीची घोषणाही कितपत व्यवहार्य आहे, असा प्रश्न प्रवासी संघटनांना पडला आहे. वातानुकुलित गाडीचे दरवाजेही स्वयंचलित असतात. या गाडीतही ठरावीक संख्येपेक्षा जास्त प्रवासी प्रवास करू शकत नाहीत. तसेच या गाडीचेही सर्व दरवाजे बंद झाल्याशिवाय गाडी प्लॅटफॉर्म सोडू शकत नाही. त्यामुळे मुंबईकरांच्या नशिबात वातानुकुलित गाडीचा गारवा आहे का, हे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.