रिक्षा-टॅक्सी यांच्या भाडय़ात एका रुपयाने वाढ झाली असली, तरी प्रत्यक्षात अद्याप मुंबईकरांना त्याची झळ बसलेली नाही. अनेक रिक्षा-टॅक्सी यांची मीटर पुनर्प्रमाणीकरण (रिकॅलिबरेट) झाली नसल्याने एका रुपयाची ही वाढ अद्यापही रिक्षा-टॅक्सीचालकांच्या खिशात पडलेली नाही. ही प्रक्रिया धिम्या गतीने सुरू असून ती जलद गतीने पूर्ण करण्यासाठी वैधमापनशास्त्रे विभाग या प्रक्रियेतील अत्यंत महत्त्वाच्या अशा ‘वेटिंग चाचणी’ला बगल देत असल्याचा आरोप रिक्षा-टॅक्सी संघटनांनी केला आहे. मात्र, वैधमापनशास्त्रे विभागाने हा आरोप फेटाळून लावत सर्व प्रक्रिया नियमाप्रमाणेच होत असल्याचे सांगितले आहे.
हकीम समितीच्या शिफारशीनुसार लागू झालेल्या भाडेवाढीला उच्च न्यायालयाने मान्यता दिल्यानंतर जून अखेरपासून रिक्षा-टॅक्सी यांच्या मीटर पुनर्प्रमाणीकरणाची प्रक्रिया सुरू झाली. गेल्या वर्षीपर्यंत ही प्रक्रिया प्रादेशिक परिवहन विभागातर्फे राबवण्यात येत असली, तरी यंदापासून हे हक्क वैधमापनशास्त्रे विभाग यांच्याकडे देण्यात आले आहेत. मात्र या प्रक्रियेला महिना उलटून गेला, तरी मुंबईतीलच तब्बल तीस हजारांहून अधिक रिक्षांची आणि १० हजारांहून अधिक टॅक्सींची मीटर पुनर्प्रमाणीकरण झालेली नाहीत.
गेल्या काही दिवसांपासून वैधमापनशास्त्रे विभाग दर दिवशी ३५०० ते ४००० रिक्षांच्या मीटर पुनर्प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करत आहे, अशी माहिती ‘वैधमापनशास्त्रे विभागा’चे नियंत्रक संजय पाण्डे यांनी दिली. मात्र ही प्रक्रिया वेगवान करण्यासाठी हा विभाग ‘वेटिंग चाचणी’ला बगल देत असल्याचा आरोप ‘मुंबई ऑटोरिक्षामेन्स युनियन’चे अध्यक्ष शशांक राव यांनी केला. प्रवासादरम्यान रिक्षा-टॅक्सी एखाद्या ठिकाणी थांबली, वाहतूक कोंडीत अडकली, तरी मीटर चालू राहते. मात्र ते मीटर किती वेळासाठी किती पडावे, याचे काही आराखडे असतात. त्यासाठी ही ‘वेटिंग चाचणी’ महत्त्वाची आहे. ही चाचणी झाली नाही आणि मीटर सील झाल्यानंतर त्यात काही चूक आढळली, तर मीटरमध्ये फेरफार केल्याच्या आरोपाखाली रिक्षाचालकांना तुरुंगवास सोसावा लागणार आहे. त्यामुळे वैधमापनशास्त्रे विभागाने अशी हयगय करू नये, असेही राव यांनी सांगितले.

याबाबत संजय पाण्डे यांना विचारले असता, प्रत्येक वाहनाच्या मीटरसाठी आम्ही १५ मिनिटांची ‘वेटिंग चाचणी’ घेत आहोत. या चाचणीला फाटा देण्याचा संबंधच येत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच रिक्षा-टॅक्सी संघटनांना याबाबत काही तक्रार असल्यास किंवा त्यांना असे प्रकार आढळले असल्यास त्यांनी तातडीने वैधमापनशास्त्रे विभागाला ते निदर्शनास आणून द्यायला हवे. तसेच या प्रकरणांबाबत तक्रार नोंदवायला हवी, असा सल्लाही त्यांनी दिला.