इनमीन आठ नगरसेवकांच्या बळावर उपमहापौरपद पदरात पाडून घ्यायचे आणि अस्थिर राजकीय परिस्थिती ओळखून संधी मिळेल तेव्हा मित्रपक्षाची कोंडी करायची या ठाण्यातील भारतीय जनता पक्षाच्या सौदेबाजीच्या राजकारणाला शिवसेना नेत्यांनी शुक्रवारी जोरदार चपराक लगावली. विशेष म्हणजे, शिवसेनेला त्यांच्या बालेकिल्ल्यात धक्का देण्याची भाषा एकीकडे केली जात असताना आपल्या घरातील पोकळ वासे कळव्याचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनाही कळले नाहीत. राष्ट्रवादीचे वाघोबानगरचे नगरसेवक गणेश साळवी यांना गळाला लावत शिवसेनेने आव्हाड यांनाही त्रिफळाचीत केले. महापालिका निवडणुकांच्या पूर्वीपासून सुरू असलेल्या फोडाफोडीच्या राजकारणाचा नवा अध्याय या घडामोडींमुळे पुन्हा एकदा सुरू झाला असून महापालिकेच्या अर्थकारणावर ताबा मिळवत शिवसेनेने सध्या तरी यामध्ये आघाडी घेतल्याचे चित्र दिसत आहे.
गेल्या वर्षी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला हाताशी धरत ठाणे महापालिकेच्या स्थायी समितीवर काँग्रेस, राष्ट्रवादीने सत्ता प्रस्थापित केली होती. महापौर शिवसेनेचा, अर्थकारण मात्र आघाडीच्या ताब्यात, असे काहीसे चित्र यामुळे निर्माण झाले होते. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत यंदा स्थायी समितीवर वरचष्मा मिळवायचा या इराद्याने शिवसेना नेते गेल्या काही महिन्यांपासून कामाला लागले होते. स्थायी समितीत आघाडी आणि युतीकडे समसमान संख्याबळ असल्याने मनसेच्या एका सदस्याची भूमिका निर्णायक ठरली होती. त्यामुळे मनसे नेतृत्वाची समजूत काढत शिवसेना नेत्यांनी आघाडीच्या आव्हानातील हवा काढून घेतली होती. मनसेची साथ मिळत नसल्याचे पाहून आघाडीच्या नेत्यांनी भाजपला गळाला लावले. पक्षाचे बी-केबिन भागातील ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीच्या मदतीने स्थायी समितीसाठी अर्ज भरला. यामुळे शिवसेनेच्या गोटात काही काळ अस्वस्थतेचे वातावरण होते. बसपच्या विलास कांबळे यांना स्थायी समितीची उमेदवारी देताना महापौर निवडणुकीत त्यांनी केलेल्या मदतीची परतफेड करावी, असा हेतू होता. त्यामुळे युतीचा घटकपक्ष म्हणून भाजपने हे मान्य करायला हवे होते. मात्र वाघुले यांनी शिवसेनेला अंगावर घेत उमेदवारी दाखल केली. त्यामुळे राष्ट्रवादीचे कळव्यातील नगरसेवक गणेश साळवी यांना गळाला लावत शिवसेनेने भाजपच्या आव्हानातील हवाच काढून घेतली. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक मनोहर साळवी यांच्या आग्रहामुळे वर्षभरापूर्वी आव्हाड यांनी गणेश यांची वर्णी स्थायी समितीवर लावली होती. स्थायी समिती सभापतीपद निवडणुकीच्या पूर्वसंध्येला गणेश साळवी यांनी आपल्या नगरसेवकपदाचा राजीनामा दिल्याने आघाडीच्या गोटात खळबळ उडाली. स्थायी समितीत आघाडीचा एक सदस्य आपसूक कमी झाला आणि भाजप, राष्ट्रवादीच्या आव्हानातील हवाच निघून गेली.
आव्हाडांना धक्का
गणेश साळवी यांचा वाघोबानगर प्रभाग आव्हाड यांच्या कळवा-मुंब्रा मतदारसंघात मोडतो. समाजवादी पक्ष, भाजप, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी आणि पुन्हा शिवसेना असा राजकीय प्रवास करणारे साळवी यांनी वर्षभरापूर्वी शिवसेनेतून राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. शिवसेनेने त्यांना स्थायी समितीचे सभापतीपद देऊ केले होते. तरीही निवडणुकांची हवा लक्षात घेऊन तेव्हा साळवी राष्ट्रवादीत गेले. शिवसेनेने स्थायी समितीचे गणित जुळविताना त्यांना पुन्हा पक्षात आणले आहे. हे करत असताना त्यांना थेट विधानसभेची उमेदवारी देण्याचे आश्वासन देण्यात आल्याची चर्चा आहे. आव्हाडांच्या घरातला नगरसेवक गळाला लावून राष्ट्रवादीला त्रिफळाचीत करण्यात शिवसेना नेते यशस्वी ठरले असले तरी ठाण्याच्या राजकारणात पुन्हा एकदा फोडाफोडीच्या राजकारणाला धुमारे फुटण्याची शक्यता नाकारता येत नाही.