राष्ट्रीय छात्रसेना दिनानिमित्त कोल्हापूर गट मुख्यालयातर्फे आयोजित विविध उपक्रमांची सांगता मंगळवारी सहा महाराष्ट्र गर्ल्स बटालियन एन.सी.सी.ने संयोजन केलेल्या छात्रसैनिकांच्या जनजागरण फेरीने झाली. या फेरीत छात्रसैनिकांनी उत्साही सहभाग नोंदविला. या फेरीमध्ये कॉमर्स, राजाराम, महावीर, शहाजी, गोखले, न्यू, के.एम.सी. कॉलेजचे विद्यार्थी व विविध महाविद्यालयांतील शाळांचे एकूण ७०० छात्रसैनिक उपस्थित होते.
राष्ट्रीय छात्रसेना ही प्रशिक्षित मनुष्यबळ घडविणारी तरुणांची जगातील सर्वात मोठी संघटना आहे. राष्ट्रहित व समाजहिताच्या अनेक मोहिमा राबविण्यात राष्ट्रीय छात्रसेनेचा सातत्यूपूर्ण सहभाग असतो. या पाश्र्वभूमीवर राष्ट्रीय छात्रसेना दिनानिमित्तच्या उपक्रमांची सांगताही जनजागरण फेरीने करण्यात आली. सकाळी ८.३० वाजता बिंदू चौकात छात्रसैनिक शिस्तबध्दपणे एकत्र आल्यानंतर शपथ कार्यक्रम झाला.
फेरीच्या समन्वयक सहयोगी एन.सी.सी. अधिकारी मेजर डॉ. रूपा शहा यांनी छात्रसैनिकांना एड्सविरोधी शपथ दिल्यानंतर सहा महाराष्ट्र गर्ल्स बटालियन एन.सी.सी.चे कमांडिग ऑफिसर कर्नल अरविंद सेठी यांच्या हस्ते निशान दाखवून फेरीची सुरुवात करण्यात आली. ही फेरी देवल क्लब, मिरजकर तिकटी, महाव्दाररोड, माळकर तिकटी या मार्गाने टाऊन हॉलकडे आली. फेरी सुरू असतांना छात्रसैनिकांच्या हाती स्त्रीभ्रूण हत्या, व्यसनमुक्ती, एडस् नियंत्रण, रक्तदान, नेत्रदान या विषयीचे फलक होते. तसेच घोषणाही दिल्या जात होत्या. फेरीचा समारोप टाऊन हॉल या ठिकाणी झाला. फेरी यशस्वी करण्यासाठी कॅप्टन सुमनसाठे, लेप्टनंट कदम, सुभेदार मेजर बाळासाहेब जमादार, सानिया यांचे सहकार्य लाभले.