लातुरातील शब्दवेल प्रतिष्ठानच्या वतीने कथा, कविता व कादंबरी अशा साहित्यकृतींसाठी दरवर्षी देण्यात येणारे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. सन २०१२साठीचे हे पुरस्कार प्रतिष्ठानने जाहीर केले आहेत.
रत्नागिरीचे रामचंद्र नलावडे (कादंबरी), बुलढाण्याचे अजित नवाज राही व नांदेडचे डॉ. सुरेश सावंत (कविता), तर बेळगावचे गुणवंत पाटील व अमरावतीचे निळकंठ गोपाळ मेंढे (कथा) हे पुरस्काराचे मानकरी आहेत. शब्दवेल प्रतिष्ठानच्या वतीने २००९पासून साहित्य क्षेत्रातील पुरस्कार दिले जातात. कादंबरी प्रकारात रत्नागिरीच्या रामचंद्र नलावडे यांच्या ‘माझ्या मना बन दगड’ या कादंबरीस व डॉ. सुरेश सावंत यांच्या ‘धुनी’ला २१ हजारांचा बळीराम मोरगे पुरस्कार विभागून जाहीर करण्यात आला. कथेत गुणवंत पाटील यांच्या ‘भुरळ’ व निळकंठ गोपाळ मेंढे यांच्या ‘अरण्यविना’ ला २१ हजार रुपयांचा सिद्रामअप्पा मलंग पुरस्कार विभागून, तर कवितेत ५ हजार रुपयांचा सिद्रामअप्पा चिल्ले राज्यस्तरीय पुरस्कार अजीम नवाज राही यांच्या ‘कल्लोळातील एकांत’ला जाहीर झाला.
पुरस्कारासाठी कादंबरीत १७, कथेत २३ तर कवितेत ३० साहित्यकृती प्राप्त झाल्या. त्यातून निवड समितीने पुरस्कार जाहीर केले आहेत. पुरस्कार निवड समितीत डॉ. वासुदेव मुलाटे, डॉ. हृषीकेश कांबळे, डॉ. नागनाथ पाटील, मथुताई सावंत, कवी शंकर वाडेवाले व प्रा. सुरेंद्र पाटील यांनी काम पाहिल्याचे संयोजक रमेश चिल्ले यांनी सांगितले. २०१२ व २०१३ या दोन वर्षांचा पुरस्कार वितरण सोहळा लवकरच होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.