भारतातील प्रत्येकी तीन महिलांतील एका महिलेला ‘ऑस्टीओपोरोसिस’ हा महाभयंकर आजार असून त्यातील २० टक्के महिलांचा मृत्यू जनजागृतीच्या अभावामुळे होत आहे. ७० टक्के महिला ऑस्टीओपोरोसिसमुळे त्रस्त असतात तर फक्त १० टक्के महिला उपचार करून बऱ्या होतात. हा आजार असलेल्या महिलांमध्ये जागृती व्हावी, त्यांच्या जीवनात बदल घडून यावा, या उद्देशाने नागपुरातील चौधरी ऑस्टीओपोरोसिस रिसर्च फाऊंडेशनतर्फे ग्रामीण भागात जनजागृती केली जात असल्याची माहिती फाऊंडेशनचे प्रमुख व प्रसिद्ध अस्थीरोग तज्ज्ञ डॉ. संजीव चौधरी यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
    वयाच्या ४५ वर्षांनंतर महिलांमध्ये कॅल्शीयमचे प्रमाण कमी कमी होत जाते. कालांतराने अस्थी अत्यंत ठिसूळ होतात. यानंतर कोणतेही कारण नसताना या अस्थी तुटतात. यालाच ‘फ्रॅजिलिटी फ्रॅटिलिटी’ असे म्हणतात. या तुटलेल्या अस्थी नंतर जुळत नाही. त्यासाठी अस्थीमधील कॅल्शीयमचे प्रमाण कमी होऊ न देण्याची खबरदारी घेणे आवश्यक असते. सध्या फ्रॅक्चरचे प्रमाण एवढे वाढले आहे की, भारतात ५० टक्के फ्रॅक्चर हे ऑस्टीओपोरोसिसमुळे होईल, अशी भीती तज्ज्ञ व्यक्त करत आहे. ‘बीएमडी’ चाचणी केल्यास त्याद्वारे अस्थितील कॅल्शीयमचे प्रमाण किती आहे ते कळते. घनता कमी असल्यास त्यानुसार औषधोपचार करता येतो. सतत काही दिवस औषध घेतल्यास अस्थीमध्ये कॅल्शीयमचे प्रमाण वाढते व ऑस्टीओपोरोसिस या आजारापासून मुक्ती मिळते.
    परंतु ग्रामीण महिलांमध्ये ऑस्टीओपोरोसिस म्हणजे काय, याचीच माहिती नाही. जेव्हा अस्थितील कॅल्शीयमचे प्रमाण अत्यंत कमी होते. यानंतर जो काही त्रास सुरू होतो, त्यानंतर या महिला रुग्णालयात जातात. परंतु तोपर्यंत बराच उशीर झाला असतो. अशी परिस्थिती निर्माण होऊ नये. ग्रामीण भागातील महिलांमध्ये जनजागृती निर्माण व्हावी. त्यांनी वेळेवर तपासणी करून औषधोपचार घ्यावा, हा सल्ला देण्यासाठी चौधरी फाऊंडेशन पुढाकार घेत आहे. या फाऊंडेशनतर्फे नुकतेच एक शिबीर तायगाव (खैरी), तह-सौंसर, जिल्हा-छिंदवाडा येथे आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात गावातील महिला मोठय़ा प्रमाणात सहभागी झाल्या होत्या. या महिलांनी उपस्थित केलेल्या शंकाचे निरसन डॉ. संजीव चौधरी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून केले. त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यांना योग्य तो सल्ला दिला. या शिबिरामुळे त्या महिलांमध्ये एक आत्मविश्वास निर्माण झाला, अशी माहितीही डॉ. चौधरी यांनी याप्रसंगी दिली.
 भारतातील एकाही महिलेला ऑस्टीओपोरोसिस होऊ नये, हा उद्देश ठेवून या संस्थेने महिलांना मार्गदर्शन करण्याचा विडा उचलला आहे. यासाठी ‘हिटको’ (हेल्थ एज्युकेशन अ‍ॅण्ड टेली कॉन्सुलेशन ऑन ऑस्टीओपोरोसिस) हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. या उपक्रमास लोकप्रतिनिधी आमदार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य व ग्रामपंचायत सदस्यांनी पुढाकार घ्यावा. त्यांनी प्रत्येक गावात अंगणवाडी सेविकेच्या मदतीने गावातील महिलांचे शिबीर आयोजित करावे. यात सहभागी झालेल्या महिलांना योग्य मार्गदर्शन केले जाईल. पुढील एक वर्षांत शंभर गावात असे शिबीर आयोजित करण्यात येतील. तर प्रत्येक आठवडय़ातून दोन दिवस हे शिबीर आयोजित करण्यात येईल. या शिबिरात उपस्थित महिलांना नागपुरातून व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून योग्य मार्गदर्शन करण्यात येईल. यासाठी येणारा खर्च स्वत: फाऊंडेशन करणार आहे. या उपक्रमास सामाजिक कार्यकर्त्यांनी सहकार्य करावे, असे आवाहनही डॉ. संजीव चौधरी यांनी यावेळी केले. पत्रकार परिषदेला आयुर्वेदाचार्य जी.एन. तिवारी, डॉ. विवेक तिवारी, प्रकाश वसू, प्रसन्नजीत भोयर, चंद्रशेखर कोल्हे उपस्थित होते.