जीवनाच्या सर्वच क्षेत्रांत आज प्रचंड उलथापालथ होत आहे. महिला सबलीकरणासाठी नवनवे कायदे होत आहेत. परंतु कायदा किती स्त्रियांपर्यंत पोहोचतो किंवा कायद्यापर्यंत किती स्त्रिया पोहोचतात हा खरा संशोधनाचा विषय आहे, असे परखड मत मराठवाडा लेखिका साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा प्रा. डॉ. मथू सावंत यांनी केले.
बीड येथे आयोजित मराठवाडा साहित्य परिषदेच्या चौथ्या दोन दिवसीय विभागीय लेखिका साहित्य संमेलनास शनिवारी सुहासिनी इर्लेकर साहित्यनगरीत प्रारंभ झाला. त्यावेळी त्या बोलत होत्या. व्यासपीठावर स्वागताध्यक्षा डॉ. दीपा क्षीरसागर, राज्यमंत्री फौजिया खान, ज्येष्ठ लेखिका लीना मेहंदळे, पालकमंत्री जयदत्त क्षीरसागर, कौतिकराव ठाले पाटील आदी उपस्थित होते.
प्रा. सावंत यांनी सांगितले की, रोज नवा संघर्ष, नवे प्रश्न व नवे बदल दारावर येऊन आदळत आहेत. अनेक लेखिका परंपरा आणि नैतिकतेचे ओझे डोक्यावर घेऊनच लिहितात. त्यामुळे काही महत्त्वाचे लिहायचे राहून जाते. लेखनात येणारी तिची भाषा ती स्वत:च सेन्सॉर करून घेते, म्हणून बऱ्याच वेळा कठोर बुद्धिवादी लेखनापेक्षा तिचे लेखन हळवे व भावूक होऊन जाते. ग्रामीण मुली का लिहीत नाहीत, याचा शोध घेण्याची गरज निर्माण झाली आहे. या मुलींमध्ये आत्मविश्वास व आत्मभान येण्यासाठी कुटुंब, समाज व शिक्षणव्यवस्था कुठे तरी कमी पडते आहे, असे मला वाटते. या मधुकलिता मुक्त लिहू-बोलू लागतील, तेव्हा नक्कीच अपरिचित विश्व उजागर होईल.
फौजिया खान म्हणाल्या की, आतापर्यंत झालेल्या बलात्कारांच्या घटनांचे संशोधन केले तर बहुतांशी घटना दारू पिऊन झाल्याचे दिसून येईल. त्यामुळे सरकारने दारूविक्रीतून मिळणारा फायदा नाकारून प्रसंगी साखर, तेल इतर धान्य महागले तरी चालेल. मात्र, संपूर्ण दारूबंदीचा निर्णय घेतला पाहिजे.
महात्मा गांधी म्हणत, दारू प्यायलेल्या माणसाला आई, बहीण, पत्नी यात फरक दिसत नाही. त्यामुळे महिलांवरील अत्याचारांत दारू हे एक प्रमुख कारण आहे. साहित्य हे स्वत:बरोबर समाजाचे वास्तव व्यक्त करणारे प्रभावी माध्यम आहे. ग्रामीण भागातील महिलांना आजही व्यथा सांगता येत नाहीत. त्यांना साहित्यातून आवाज मिळाला पाहिजे. मंत्री क्षीरसागर यांनी, दारूच्या व्यसनातून महिलांवरील अत्याचारांत वाढ होत आहे. त्यासाठी सरकारने गावात मतदानाने दारूबंदीचा निर्णय घेतला. संपूर्ण दारूबंदीचा विषय योग्य वेळी मांडू.
ज्येष्ठ लेखिका लीना मेहंदळे यांनी आपली पहिली नियुक्ती सांगली येथे झाली. त्यानंतर एका गावात महिलांनी स्वतंत्रपणे दारूबंदी करण्याची मागणी केली. मात्र, सरकारी धोरणांमुळे ते शक्य झाले नाही, असे सांगताना सरकारने मोह सोडून दारूबंदी करावी, अशी मागणी केली.
कौतिकराव ठाले पाटील यांनी लेखिका साहित्य संमेलनाचे व्यासपीठ हे सामाजिक जागृतीची चळवळ व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करून महिलांवरील अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारांना लोकप्रतिनिधींकडून मिळणारे पाठबळ थांबले पाहिजे. स्त्रीवाद म्हणजे लैंगिकतेचे उदारीकरण नाही, हे समजून घेणे आवश्यक असल्याचे म्हटले.