News Flash

व्यसनमुक्तीसाठी तंटामुक्त गाव समित्यांकडून जनजागृती

गावातील शांततेचे वातावरण विकास प्रक्रियेला पोषक ठरत असते. ही बाब लक्षात घेऊन शासनाने ग्रामीण भागातील तंटा -बखेडय़ांचे प्रमाण कमी करण्यासाठी महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान

| April 26, 2013 02:50 am

गावातील शांततेचे वातावरण विकास प्रक्रियेला पोषक ठरत असते. ही बाब लक्षात घेऊन शासनाने ग्रामीण भागातील तंटा -बखेडय़ांचे प्रमाण कमी करण्यासाठी महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान सुरू केले आहे. या माध्यमातून स्थानिक पातळीवरील तंटे सामोपचाराने मिटविणे आणि विविध स्वरूपाचे उपक्रम राबवून ग्रामीण भागाच्या विकासाला चालना देण्याचा प्रयत्न होत आहे. या अभियानातील एकूणच कामगिरीचा वेध लेखमालेतून घेण्यात येत आहे. मालेतील साठावा लेख.
ग्रामीण भागातील अवैध धंदे रोखण्यासाठी तंटामुक्त गाव समितीने पुढाकार घेतानाच दुसरीकडे गावातील व्यसनांच्या आहारी गेलेल्या व्यक्तींना व्यसनमुक्त करण्याकरिता प्रयत्न करणेही अपेक्षित आहे. व्यसनांच्या दुष्परिणामांची जाणीव करून देण्याकरिता तंटामुक्त गाव समित्यांकडून जनजागृतीपर कार्यक्रमांचेही आयोजन केले जात आहे. तसेच अवैध धंदे रोखल्यानंतर संबंधितांना पर्यायी रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी मदत करण्याची भूमिका शासनाने घेतली आहे.
दारूचे गुत्ते, मटका व तत्सम जुगाराचे प्रकार या बेकायदेशीर व्यवसायामुळे गावातील कायदा व सुव्यवस्थेला धोका निर्माण होण्याची शक्यता असते. या व्यावसायिकांचे पोलीस यंत्रणेशी सलोख्याचे संबंध राहात असल्याने कोणी तक्रार केली तरी तिची तत्परतेने दखल घेतली जाईल याची खुद्द ग्रामस्थांना खात्री नसते. परिणामी, अनेक गावांत हे बेकायदेशीर धंदे अर्निबधपणे फोफावत जातात. ही बाब लक्षात घेऊन ग्रामस्थांनी बेकायदेशीर व्यवसायाविरोधात संघटितपणे उभे रहावे, असा उद्देश शासनाने महात्मा गांधी तंटामुक्त मोहिमेत ठेवल्याचे लक्षात येते. अवैध धंद्यांमुळे गावाच्या शांततेला बाधा येते तसेच व्यसनाधिनतेचे प्रमाण वाढल्याने संबंधितांची कुटुंबेही विचित्र फेऱ्यात सापडतात. या पाश्र्वभूमीवर, मोहिमेंतर्गत केवळ अवैध धंदे रोखणे हा एकच उद्देश न ठेवता अवैध धंदे करणाऱ्यांना पर्यायी रोजगाराकडे वळविण्यासाठी प्रयत्न करण्याकडेही लक्ष देण्यात आले आहे. गावात व्यसनमुक्ती कार्यक्रम राबविणे, व्यसनी लोकांचे समुपदेशन करणे याकरिता खास १५ गुण प्रदान केले जातात. या प्रक्रियेत अवैध धंद्यांचे निर्मूलन करताना ग्रामस्थांना आवश्यकता भासल्यास ते पोलिसांची मदत घेऊ शकतात.
शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार उत्तर महाराष्ट्रातील अनेक ग्रामपंचायतींकडून गावात व्यसनमुक्तीसाठी जनजागृतीपर कार्यक्रम राबविले जात आहेत. व्यसनामुळे कौटुंबिक कलह वाढण्याबरोबर आरोग्यावरही विपरीत परिणाम होतात. व्यसनामुळे उद्भवणाऱ्या व्याधींबद्दल डॉक्टरांमार्फत संबंधितांना इशारा देता येईल. व्यसनमुक्त झालेल्या व्यक्तींना प्रोत्साहनात्मक  अनुदान देण्याची मुभा आहे. म्हणजे जी गावे तंटामुक्त म्हणून आधीच पात्र ठरली, त्यांना मिळालेल्या पुरस्काराच्या रकमेचा विनियोग या कामासाठी करता येतो. पुरस्काराच्या एकूण रकमेच्या १५ टक्के रक्कम ग्रामपंचायत वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी वापरू शकते. जनजागृतीच्या माध्यमातून तंटामुक्त गाव समितीला ज्या व्यक्तींना व्यसनमुक्त करण्यात यश मिळाले, आणि त्यांना व्यसनमुक्त होऊन सहा महिने झालेले आहेत, अशा व्यक्तींना प्रत्येकी ३०० रुपये प्रोत्साहनात्मक अनुदान म्हणून देता येते. या उपक्रमाच्या माध्यमातून व्यसनमुक्त होणाऱ्यांना प्रोत्साहन देता येणे शक्य आहे.
   
तंटामुक्त जीवनाची सुखद अनुभूती
महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेंतर्गत संपूर्ण राज्यात तसेच नाशिक विभागात चाललेल्या कामकाजाचा आढावा ‘लोकसत्ता नाशिक वृत्तान्त’मधून ‘गाव तंटामुक्त, सर्वागयुक्त’ या लेखमालेद्वारे घेण्यात येत आहे. या लेखमालेचे वैशिष्टय़ म्हणजे नाशिक विभागातील प्रत्येक जिल्ह्यातील प्रश्न जे सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचे आणि सोडविण्याची नितांत गरज आहे, ते मांडण्यात आले आहेत. लेखमालेचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे, त्यात राखण्यात आलेली सातत्यता. प्रबोधनात सातत्य राहिल्यास कायमस्वरूपी सुधारणेचा पाया रोवला जातो. नंदुरबार भागातील दुर्गम भागात आरोग्यविषयक समस्यांबरोबरच रस्ते, शिक्षण, डाकीण प्रथा याबाबत लेखमालेतून झालेले प्रबोधन निश्चितच महत्त्वाचे आहे. तंटामुक्त गाव समितीची कामगिरी गावाला विकासाची दिशा देण्याबरोबर तंटामुक्त जीवनाचा सुखद अनुभव इतरांना सांगताना या अभियानाची नितांत गरज आणि उपयुक्तता समाजप्रबोधनासाठी अत्यंत महत्त्वाचा वाटा उचलत आहे. या लेखमालेच्या माध्यमातून होणारे प्रबोधन प्रश्नांची उकल करण्यासही महत्त्वपूर्ण ठरेल.
उज्ज्वल कुलकर्णी, नंदुरबार

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 26, 2013 2:50 am

Web Title: awareness from village committees for addiction free
Next Stories
1 सिंहस्थ कुंभमेळ्यात पर्यटन स्थळांचे ‘मार्केटिंग’
2 शहादा नगराध्यक्षपदी करुणाताई पाटील
3 धरणांमधील गाळ काढण्याची मागणी
Just Now!
X