बालहक्क अभियान व बालविकास प्रकल्प यांच्या समन्वयातून समुदायात जनजागृती निर्माण करून कुपोषणाचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल, असे विचार बालविकास प्रकल्प अधिकारी भागवत तांबे यांनी व्यक्त केले.
बालहक्क अभियान महाराष्ट्र नागपूर विभागातर्फे आयोजित कुपोषण निर्मूलनासाठी कार्य नियोजन या विषयावर अंगणवाडी सेविका व मदतनीस कार्यकर्ता प्रशिक्षण कार्यक्रम नुकताच जरीपटका येथील सनराईज कॉन्व्हेंटमध्ये आयोजित करण्यात आला होता.  या कार्यक्रमात तांबे बोलत  होते. बालहक्क अभियानाच्या कार्याची त्यांनी प्रसंशा केली.  
याप्रसंगी विशेषत: कुपोषणाची कारणे व दुष्परिणाम या विषयावर बालहक्क अभियानाद्वारे केलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल सर्वासमोर सादर करण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. अरुण हुमणे यांनी केले, तर प्रमुख अतिथी म्हणून भागवत तांबे, विशेष अतिथी म्हणून डॉ. मोहिब ए.हक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सनराईज कॉन्व्हेंटच्या संचालिका संगीता दलवानी होत्या. यावेळी प्रामुख्याने विनायक नंदेश्वर, गौतम गेडाम उपस्थित होते.
 संगीता दलवानी यांनीही संबोधित केले. कुपोषण निर्मूलनासाठी कार्यनियोजन या विषयावर सर्वानी चर्चा करून बालहक्क अभियान, सेवाभावी कार्यकर्ते, डॉक्टर तसेच बालविकास प्रकल्पाच्या समन्वयातून कुपोषण निर्मूलन जनजागृती समिती गठित करून प्रभावी कार्य करण्याचा संकल्प केला.  विनायक नंदेश्वर यांनी प्रास्ताविक केले.  संचालन नीता सहारे यांनी केले, तर आभार रिता नंदेश्वर यांनी मानले.