सरकारी कार्यालयातील लाचखोरीला आळा बसावा आणि लाचखोरांविरोधात तक्रारी करण्यासाठी नागरिकांनी पुढे यावे, या उद्देशातून ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आता थेट जनजागृती मोहिमेच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहचण्याची योजना आखली आहे. या मोहिमेत अधिकाऱ्यांचे पथक ज्येष्ठ नागरिक संघ, महिला संघ आणि वेगवेगळ्या सामाजिक संघटना आदींच्या बैठका घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेणार आहे. तसेच भ्रष्टाचार रोखण्यासाठी तक्रार कुठे आणि कशी करावी, याविषयी सविस्तर माहिती देणार आहेत. याशिवाय, रेल्वे स्थानक, मॉल्स्, आठवडा बाजार, आदी गर्दीच्या ठिकाणी महाविद्यालयाचे विद्यार्थी पथनाटय़ सादर करणार असून त्यातून भ्रष्टाचाराला पायबंद घालण्याचा संदेश देणार आहेत.
केंद्र शासनाच्या धोरणानुसार राज्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत ‘दक्षता जनजागृती सप्ताह’ राबविण्यात येणार असून त्यानुसार २७ ऑक्टोंबर ते २ नोव्हेंबर या कालवधीत ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेत नागरिकांमध्ये भ्रष्टाचाराविषयी जनजागृती करण्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम हाती घेण्यात आले आहे. नागरिकांनी लाच देऊ नये आणि तक्रारी करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहनात्मक संदेश देणारे होर्डिग्ज, पोस्टर्स्, बॅनर्स, स्टिकर्स व पत्रके तयार करण्यात आली असून ती जिल्ह्य़ातील वेगवेगळ्या भागात ठिकठिकाणी लावण्यात येणार आहे. शहरातील वेगवेगळ्या भागांत सकाळच्या वेळी नागरिक मोठय़ा संख्येने फेरफटका मारत असतात. त्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांचा मोठा सहभाग असतो. तेथेच या नागरिकांची बैठक घेऊन त्यांच्याशी अधिकारी भ्रष्टाचाराविषयी चर्चा करणार आहेत. तसेच यासंबंधी त्यांच्या समस्या जाणून घेऊन भ्रष्टाचार रोखण्यासाठी तक्रार कुठे आणि कशी करावी, याविषयी सविस्तर माहिती देणार आहेत. त्याचप्रमाणे महिला संघटना आणि वेगवेगळ्या सामाजिक संघटनांसोबतही अशाप्रकारच्या बैठका घेण्यात येणार आहेत, अशी माहिती ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक दत्ता कराळे यांनी दिली.
जिल्ह्य़ातील वेगवेगळ्या भागातील रेल्वे स्थानक, आठवडा बाजार, मॉल्स् आदी गर्दीच्या ठिकाणी नवी मुंबईतील कर्मवीर भाऊराव महाविद्यालयातील विद्यार्थी भ्रष्टाचारविरोधी पथनाटय़ सादर करणार आहेत. याशिवाय मराठी चित्रपट सृष्टीतील कलाकारांमार्फत लोकांना आवाहन करणाऱ्या चित्रफिती तयार करण्यात आल्या असून त्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. फेसबुक, व्हॅटस्अ‍ॅप या सोशल मिडीयासह एसएमएसच्या माध्यमातून लाच देऊ नका, याविषयी जनजागृती करण्यात येणार आहे. तसेच नागरिकांना तक्रार करण्यासाठी सोपे जावे, याकरिता सर्व राज्याकरिता एकच टोल फ्री क्रमांक ‘१०६४’ हा सुरू करण्यात आला आहे. या क्रमांकावर ज्या जिल्ह्य़ातून नागरिक तक्रार करतील, त्या भागातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयाशी या क्रमांकाद्वारे संपर्क होईल, असेही दत्ता कराळे यांनी सांगितले.
कारवाईचा आलेख उंचावला
ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने यावर्षी आतापर्यंत ११७ सापळे रचून कारवाई केली असून त्यामध्ये १७२ लाचखोरांना अटक करण्यात आली आहे. लाचखोरांमध्ये सर्वात जास्त म्हणजे ४७ पोलीस विभागातील आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यापाठोपाठ महापालिका २७, महसूल विभाग २२, जिल्हा परिषद १८, आदी विभागांचा क्रमांक लागतो. याशिवाय एक सभापती, सहा नगरसेवक, दोन सरपंच आणि इतर चार अशा १३ पदाधिकाऱ्यांचाही समावेश आहे. गेल्या वर्षी याच काळात ४२ सापळे रचून कारवाई करण्यात आली होती. त्या तुलनेत यंदाच्या कारवाईचा आलेख उंचावल्याचे दिसून येतो.