आयुर्वेदासारख्या हजारो वर्षांच्या पारंपरिक ज्ञानाला संशोधनाची जोड मिळाल्यावर कर्करोगासारख्या आजाराचा सामना अधिक प्रभावीपणे करता येतो याचा अनुभव गेल्या वीस वर्षांत हजारो रुग्णांना दिलेल्या डॉ. सदानंद सरदेशमुख यांच्या ‘कॅन्सरसाठी लोकोपयोगी आयुर्वेद’ या पुस्तकाचे प्रकाशन लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांच्या हस्ते झाले. गेले वर्षभर ‘लोकसत्ता’मधून प्रसिद्ध होत असलेल्या ‘कॅन्सर आणि आयुर्वेद’ या लेखमालेला मिळालेला उदंड प्रतिसाद व ही माहिती एकत्रित देण्याची आग्रही मागणी यामुळे हे पुस्तक आकाराला आले.
केवळ औषधे न देता रुग्णांना सर्वसमावेशक उपचारपद्धती देता यावी व त्याच वेळी या आजाराविषयी संशोधन करता यावे या हेतूने पुणे येथील ‘इंटिग्रेटेड कॅन्सर ट्रीटमेंट व रिसर्च सेंटर’च्या माध्यमातून कार्य केले जाते. संशोधनासोबत आरोग्य केंद्र, पंचकर्म रुग्णालय, औषधी वनस्पतींचे उद्यान, गोशाळा, योगा केंद्र आदी माध्यमातून हे काम सुरू आहे, असे डॉ. सरदेशमुख यांनी सांगितले. आयुर्वेदाच्या सिद्धांतांना शास्त्रीय पातळीवर पडताळून पाहण्याचे काम करतानाच लोकांना कर्करोगासंबंधी आयुर्वेदाची माहिती देण्याच्या हेतूने ‘कॅन्सरसाठी लोकोपयोगी आयुर्वेद’ या पुस्तकाची निर्मिती झाली.
आयुर्वेद या शास्त्रासमोर आज तीन शत्रू उभे आहेत. आयुर्वेदिक औषधांचे परिणाम आणि दुष्परिणाम यासंदर्भात सर्वसामान्यांचे अज्ञान, कोणत्याही तपासणीविना सरसकट वापरली जाणारी आयुर्वेदिक औषधे व त्याला मिळणारे सरकारी पाठबळ तसेच नवनवीन आजारांच्या शोधात असलेली औषधांची प्रचंड मोठी बाजारपेठ या तीन आव्हानांसमोर आयुर्वेदाला उभे राहावे लागत आहे, असे लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर म्हणाले. केवळ पारंपरिक ज्ञानावर अवलंबून न राहता आयुर्वेदात संशोधन होणे गरजेचे आहे. फुकाचा अभिनिवेश न बाळगता सरकारने व जनतेनेही आयुर्वेदाच्या मागे ठामपणे उभे राहायला हवे, असे आवाहन कुबेर यांनी केले.
कोणत्याही कारणास्तव रेडिओथेरपी, केमोथेरपीसारखे उपचार न घेता केवळ आयुर्वेदिक उपचारांचा आग्रह धरणारे, कर्करोगाचा पुनरुद्भव झालेले, केमोथेरपी- रेडियोथेरपी यांचे दुष्परिणाम कमी करण्यासाठी आलेले व पूर्ण नियंत्रणात आलेला कर्करोग पुन्हा उद्भवू नये म्हणून उपचार घेणारे असे कर्करोगावरील उपचारांसाठी येणाऱ्या रुग्णांचे चार प्रकार आहेत. या सर्वच रुग्णांसाठी आयुर्वेदिक उपचार उपलब्ध करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातात, असे ‘इंटिग्रेटेड कॅन्सर ट्रीटमेंट व रिसर्च सेंटर’च्या उपसंचालक विनिता देशमुख म्हणाल्या.
पुस्तक हवयं..
‘कॅन्सरसाठी लोकोपयोगी आयुर्वेद’ हे पुस्तक डॉ. सदानंद सरदेशमुख, १७२ नायगाव कॉस रोड, मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय, दादर, मुंबई. दूरध्वनी २४१३०८६६ येथे उपलब्ध आहे.