कवी बी. रघुनाथ यांच्या जन्मशताब्दीनिमित्त येथे आयोजिलेला ‘आज कुणाला गावे’ कार्यक्रम रंगतदार झाला. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ व जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने येथे तीन दिवस आयोजित जिल्हा ग्रंथोत्सवात बी. रघुनाथ यांच्या कविता-कादंबरीवर आधारित हा कार्यक्रम झाला.
श्रीकांत उमरीकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. रविशंकर झिकरे, किशोर पुराणिक, अरविंद पिंगळे, बासरीवादक गिरीश काळे यांनी हा कार्यक्रम सादर केला. १९५४ मध्ये प्रसिद्ध झालेल्या बी. रघुनाथ यांच्या ‘आडगावचे चौधरी’ कादंबरीचे वाचन यावेळी करण्यात आले. ग्रंथमहोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्री राजेश टोपे व जिल्हा माहिती अधिकारी यशवंत भंडारे यांच्या हस्ते झाले. तत्पूर्वी काढलेल्या ग्रंथफेरीचे उद्घाटन साहित्यिका रेखा बैजल यांच्या हस्ते झाले.
 जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी बी. राधाकृष्णन यांनी ग्रंथ प्रदर्शनास भेट देऊन पाहणी केली. देविदास फुलारी यांच्या उपस्थितीत झालेल्या कविसंमेलनात २२ कवींनी सहभाग घेतला. ‘मराठी वाचन संस्कृती वाढविण्यासाठी वृत्तपत्रांचे योगदान’ या विषयावर प्रा. डॉ. सुधीर गव्हाणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या परिसंवादात पत्रकार बाबा गाडे, प्रा. बी. वाय. कुळकर्णी, चंद्रप्रकाश देगलूरकर यांनी भाग घेतला. कथाकथन कार्यक्रमात किशोर घोरपडे, प्रा. बसवराज कोरे, सत्यशीला तौर व बबन आखाडे यांनी भाग घेतला.