गाडगीळांची तिसरी पिढीही वृत्तपत्र वितरण व्यवसायातच
चार पिढय़ांचा वारसा जपणाऱ्या  बी. एस. गाडगीळ आणि कंपनी या वृत्तपत्र वितरण एजन्सीला गुरूवारी शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. वृत्तपत्र वितरण व्यवसायात शताब्दी पूर्ण करणाऱ्या गाडगीळ कंपनीची वाटचाल ऐतिहासिक व साहसी म्हटली जाते.
भास्कर सदाशिव गाडगीळ यांना इंग्रजी वाचनाची आवड होती. भारतात ब्रिटीशांची राजवट असताना ते सर्वोच्च गुण घेऊन मामलेदार पदाची परीक्षा उत्तीर्ण झाले. पण सरकारी नोकरी झुगारून ते ‘फायर इन्शुरन्स’ चा व्यवसायाकडे वळले. १९११-१२ मध्ये मुंबईच्या इंग्रजी दैनिकांशी त्यांनी पत्रव्यवहार केला.
आपणास टपालाने का होईना पण इंग्रजी वृत्तपत्र मिळावे म्हणून त्यांनी वार्षिक वर्गणीची चौकशी केली. भास्कर गाडगीळांचा इंग्रजी वाचनाचा छंद व त्यांच्याथील व्यावसायिकता, त्या इंग्रजी वृत्तपत्राच्या व्यवस्थापनाने हेरली. ‘तुम्हीच काय एकटे वाचता, कलेक्टर सिमकॉक्ससह इतरही वाचकांना तेथे आपले वृत्तपत्र हवे आहे तेव्हा तुम्हीच वितरक व्हा’ असा सल्ला त्यांना देण्यात आला. आपण स्वत: व्यावसायिक असल्याने हे काम आपणास सहज जमेल असेही त्यांना वृततपत्राच्या व्यवस्थापनाने सांगितले. त्यातूनच २७ डिसेंबर १९१२ रोजी त्यांनी वृत्तपत्र वितरण व्यवसायास सुरूवात केली. म्हणजेच मे. बी. एस. गाडगीळ आणि कंपनीचा जन्म झाला.
हा व्यवसाय पुढे वा. भा. गाडगीळ यांनी सांभाळला. वितरण व्यवस्था कशी असावी, या सर्व बाबींचा त्यांनी अभ्यास केला. आपला वृत्तपत्र वितरणाचा व्यवसाय प्रामाणिकपणे, निष्ठेने व जिद्दीने पुढे नेण्याचा व वाढविण्याचा प्रयत्न त्यांनी केला.  वा. भा. गाडगीळ यांच्यानंतर सदानंद गाडगीळ व त्यांच्यानंतर त्यांची सचिन व श्रीधर ही मुले हा व्यवसाय सांभाळत आहेत. आम्हा गाडगीळ कुटुंबियांच्या नशिबी हे भाग्य आले असल्याची भावना सचिन गाडगीळ यांनी व्यक्त केली. चाणक्ष वाचकवर्ग, सहयोगी, विक्रेते बंधू आणि अविश्रांत वितरण करणारे विद्यार्थी यांचे सहकार्य लाभल्याने हा पल्ला गाठता येणे शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले.