वेळ व दिलेला शब्द न पाळणे म्हणजेच भ्रष्टाचार करणे अशी समज देत राजा शिवाजींच्या कारभाराचे इतिहासकालीन जाणीव व्याख्यानाच्या मार्फत रविवारी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी पनवेलमधील व्याख्यानात करून दिली.
कांतिलाल प्रतिष्ठानतर्फे चैतन्य लोकोत्सव हा सांस्कृतिक कार्यक्रम ठेवण्यात आला होता त्याचे उद्घाटन पुरंदरे यांच्या व्याख्यानाने सुरू झाले. या कार्यक्रमाला पनवेलकरांची उपस्थिती तुलनेत कमी होती. वयाच्या ९३व्या वर्षी बाबासाहेब यांच्या न विसरणाऱ्या संदर्भामुळे पनवेलकरांना पुरंदरे यांचे कौतुक वाटत होते. व्याख्यानाच्या शिवराय व जिजाऊंच्या काळातील राज्यकर्त्यांची परिस्थिती व वर्तमानातील राज्याची स्थिती याबाबत साधम्र्य या वेळी पुरंदरे यांनी केले. पुरंदरे यांच्या निवेदनानंतर शिवबांच्या जीवनपटावर गीतांचे सादरीकरण ज्येष्ठ संगीतकार व गायक हृदयनाथ मंगेशकर, विभावरी आपटे, राधा मंगशेकर यांनी केल्याने या लोकोत्सवाचे वातावरण चैतन्यपूर्ण झाले होते. या कार्यक्रमात पनवेलचे उद्योजक जे. एम. म्हात्रे यांना सवरेत्कृष्ट उद्योजक या पुरस्काराने प्रतिष्ठानतर्फे सन्मानित करण्यात आले. पुरंदरे यांनी या वेळी पनवेलच्या भूमीतील शिवरायांचे महत्त्व पनवेलकरांना पटवून दिले. पेणमधील मीरे गड व पनवेलमधील कर्नाळा किल्ल्याची माहिती या वेळी दिली. तसेच जिजाऊंच्या काळात राज्यकर्त्यांनी कधी दौरे करून राज्यकारभार केला नाही असा उपरोधिक टोला राजकारण्यांवर लगावला.
पनवेलचे नगरसेवक मागील आठवडय़ात कुलू-मनाली येथे अभ्यास दौऱ्यावर गेले होते. शिवाजी महाराज जयंतीपुरते आठवणीत ठेवायचे नसतात, ते प्रत्येकाच्या रक्तात भिनले पाहिजेत असेही या वेळी पुरंदरे म्हणाले. सध्याचे राजकारणी लाल दिव्यासाठी हपापलेले असतात, मात्र शिवकालीन राज्यकारभार हा लोकहितासाठी असायचा अशी आठवण त्यांनी करून दिली.