आचार्य अत्र्यांचे वर्णन करायचे झाले तर त्यांची ताकद कु ऱ्हाडीची होती आणि मन सोनचाफ्याच्या फुलासारखे कोमल होते. महाराष्ट्राला मिळालेल्या आचार्य अत्रेरूपी या देणगीचा वारसा पुढे चालावा. तो थबकू नये आणि संपूही नये, अशा शब्दांत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
आचार्य अत्रे यांच्या ११६ व्या जयंतीनिमित्त ‘आत्रेय’ संस्थेतर्फे बुधवारी प्रभादेवी येथील रवींद्र नाटय़ मंदिरात एका कार्यक्रमात बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते ज्येष्ठ संगीतकार व गायक पं. हृदयनाथ मंगेशकर यांना ‘आचार्य अत्रे मानचिन्ह’ देऊन गौरविण्यात आले. ज्येष्ठ पत्रकार भारतकुमार राऊत हेही या वेळी प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. अत्रे यांच्या वागण्यात आणि बोलण्यात कृष्ण आणि नारदासारखा खोडकरपणा होता, असे बाबासाहेब म्हणाले. ‘आचार्य अत्रे यांच्या नावाचा पुरस्कार मला मिळाला. हा पुरस्कार मिळाल्यानंतर मी अत्रे कुटुंबीयांच्या ऋणातच राहू इच्छितो,’ अशा शब्दात पं. मंगेशकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
या कार्यक्रमात अत्र्यांच्या ‘कऱ्हेचे पाणी (खंड-७) या चरित्र ग्रंथाचे बाबासाहेबांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. याचे संकलन, संशोधन आचार्य अत्रे यांच्या कन्या मीना देशपांडे यांनी केले आहे. आचार्य अत्रे यांच्या कन्या व ज्येष्ठ कवयित्री शिरीष पै यांनी लिहिलेल्या ‘हे काय हायकू’ या पुस्तकाचेही प्रकाशन या वेळी झाले. तसेच आचार्य अत्रे लिखित ‘गुद्दे आणि गुदगुल्या’ या पुस्तकाच्या नव्या आवृत्तीचेही प्रकाशन या वेळी करण्यात आले. डिम्पल प्रकाशनाने हे पुस्तक प्रकाशित केले आहे. कार्यक्रमाची सुरुवात राधा मंगेशकर यांनी गायलेल्या काही गाण्यांनी तर कार्यक्रमाची सांगता चौरंग प्रस्तुत ‘अत्रे अत्रे सर्वत्रे’ या कार्यक्रमाने झाली. कार्यक्रमाची संकल्पना, लेखन आणि दिग्दर्शन अशोक हांडे यांचे होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आचार्य अत्रे यांचे नातू अॅड. राजेंद्र पै यांनी केले.