महिला बचत गटांनी पापड व लोणचे निर्मितीचे काम बंद करून आता इलेक्ट्रॉनिक्स व इतर बडय़ा उद्योगांना लागणारे साहित्य पुरविण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केले. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वाढोली येथील  सपकाळ नॉलेज हब येथे यशस्विनी सामाजिक अभियानतर्फे आयोजित कार्यशाळेत ते बोल होते. पवार यांच्या हस्ते ४२ महिलांना यशस्विनी सन्मान पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
अध्यक्षस्थानी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ तर प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील, खा. सुप्रिया सुळे आदी उपस्थित होते. या निमित्ताने महिलांचे प्रश्न, महिलांसमोरील आव्हाने, स्त्री भ्रुण हत्या, महिला आरक्षण, बचत गट चळवळीचे योगदान अशा महत्वपूर्ण विषयांचा वेध घेणाऱ्या ‘यशस्विनी विश्व स्वप्नपूर्तीसाठी घालू गगनाला गवसणी’ या विशेष स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.
यावेळी पवार यांनी यशस्विनी सामाजिक अभियानामार्फत सुरू असलेल्या कार्याची प्रशंसा केली. अभियानाने पाच वर्षांत एक लाख बचत गटांची स्थापना केली आहे. संपूर्ण राज्यात १६८० समन्वयक त्यांची जबाबदारी सांभाळत आहेत. या चळवळीत अनेक संस्था कार्यरत असल्या तरी राज्यातील जवळपास निम्मे काम यशस्विनी सामाजिक अभियान करत आहे, असेही ते म्हणाले. महिलांमध्ये कर्तृत्वाची कमतरता नाही. संधी मिळणे गरजेचे असते. अशी संधी मिळाली नाही तर ती हिसकावून घेता आली पाहिजे, हा आत्मविश्वास या कार्यातून महिलांमध्ये निर्माण झाला. स्वीकारलेले काम नेटाने करणे, त्यात सातत्य राखणे आवश्यक आहे. विज्ञानावर विश्वास ठेवा. आधुनिक विचारांची आस आणि परिवर्तनाची कास धरण्याचे आवाहन त्यांनी केले. बचत गट चळवळींच्या माध्यमातून महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला आहे. सातत्याने नाविन्यतेचा ध्यास घेऊन बचत गटांनी आपल्या उत्पादनात बदल घडवून आणावा, अशी अपेक्षाही पवार यांनी व्यक्त केली.
महिलांवरील वाढणारे अत्याचार लक्षात घेऊन जिल्हा व तालुका पातळीवर दक्षता समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. या समित्यांमध्ये आता महिला बचत गटातील एक आणि युवतींमधून एक अशा दोन जणींची सदस्य म्हणून नेमणूक केली जाईल, असे आर. आर. पाटील यांनी सांगितले. यावेळी पाटील यांनी ग्रामविकास विभागाचे मंत्रिपद स्वत:कडे असताना बचत गट चळवळीसाठी केलेल्या कार्यास उजाळा देताना तेव्हाची स्थिती आणि आताची स्थिती यातील झालेले कमालीचे बदल नमूद केले. तेव्हा बचत गटांकडे केवळ उद्दीष्टपूर्ती म्हणून पाहिले जात होते. बचत गट म्हणजे अनुदान व कर्ज मिळविण्याचे साधन ठरले होते. तेव्हा गटातील महिलांना कोणतेही प्रशिक्षण दिले जात नव्हते. यामुळे महिलांमध्ये एकप्रकारची उदासिनता आली होती, ही बाब पाटील यांनी मान्य केली. यशस्विनी सामाजिक अभियानाच्या माध्यमातून तंत्रशुद्ध प्रशिक्षण दिले जात असल्याने महिलांमधील उद्योजगता वाढीस लागल्याचे त्यांनी नमूद केले.
अभियान संचालक सुळे यांनी कौटुंबिक हिंसाचारात सापडलेल्या महिलांना आधार देण्यासाठी यशस्विनी अभियानामार्फत शासनाच्या मदतीने निर्वासित छावण्यांची स्थापना केली जाणार असल्याचे सांगितले. यशस्विनी सामाजिक अभियानाचे ‘पोर्टल’ लवकरच सुरू करण्यात येईल, असे त्यांनी नमूद केले. नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी महिलांना राजकीय क्षेत्रात ५० टक्के आरक्षण मिळाले असले तरी त्यांना स्वत:ला अजून सिद्ध करायचे आहे. राजकीय क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी सामाजिक क्रांतिचा महिलांनी अभ्यास करण्याचे आवाहन त्यांनी केले.

* ४२ यशस्विनींचा गौरव
कार्यशाळेत ४२ यशस्विनींचा गौरव करण्यात आला. राज्यस्तरीय यशस्विनी सन्मान पुरस्काराने उस्मानाबाद येथील वैशाली मोटे यांना सन्मानित करण्यात आले. त्यांना देण्यात आलेल्या पुरस्काराचे स्वरूप २१ हजार रूपये, स्मृतीचिन्ह व सन्मानपत्र असे आहे. तर विभागीय यशस्विनी सन्मान पुरस्काराचे स्वरूप १५ हजार रूपये, स्मृतीचिन्ह व सन्मानपत्र तर जिल्हास्तरीय पुरस्काराचे स्वरूप ११ हजार रूपये, स्मृतीचिन्ह व सन्मानपत्र असे आहे. विभागीय पुरस्काराने नाशिकच्या संगिता सुराणा यांना तर जिल्हास्तरीय पुरस्कारार्थीमध्ये तिलोत्तम पाटील (जळगाव), शोभाताई मोरे (नंदुरबार). जयश्री अहिरराव (धुळे), हेमलता मानकर (नाशिक) यांचा समावेश आहे. विशेष सन्मान पुरस्काराने जळगाव येथील कल्पना पाटील यांना सन्मानित करण्यात आले. सन्मान पुरस्कार विजेत्या महिलांच्या मागे खंबीरपणे उभे राहणाऱ्या त्यांच्या पती व कुटूंबातील व्यक्तींचाही याप्रसंगी गौरव करण्यात आला.