अनुसूचित जाती-जमातीच्या एकाही आमदार-खासदारात विधिमंडळात मागासवर्गीयांच्या प्रश्नावर बोलण्याची धमक नसल्याची टीका ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ व मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी केली.  
मागसवर्गीयांच्या शिक्षणाचे, रोजगाराचे, दलित किंवा स्त्रियांवरील अत्याचाराचे प्रश्न स्वत:च्या पार्टीच्या सदस्यांसमोर मांडणे किंवा त्याला वाचा फोडण्याची हिंमत कोणीही आमदार-खासदार दाखवत नसून डॉ. मुणगेकरांनी भाजपावरही टीका केली. डॉ. आंबेडकर टिचर्स वेल्फेअर असोसिएशनच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा मानवाधिकार, सामाजिक-आर्थिक धोरणे आणि सकारात्मक कृती’ या विषयावर ते बोलत होते. व्यासपीठावर इंडियन काउन्सिल ऑफ सोशल सायन्सेस रिसर्चचे अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात, दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष पद्मश्री मिलिन्द कांबळे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास सपकाळ आणि माजी लोकसभा सदस्य प्रा. जोगेंद्र कवाडे यांच्यासह आयोजक संघटनेचे अध्यक्ष डॉ. प्रदीप हाडके आणि सरचिटणीस प्रा. संजोक तुपे होते.
संविधान दिनाच्या मुहूर्तावर आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात डॉ. मुणगेकर म्हणाले, विधिमंडळातील आरक्षणापेक्षाही शिक्षण आणि रोजगारातील आरक्षण महत्त्वाचे आहे. मागासवर्गीयांसाठी मेरिट, गुणवत्तेचे प्रश्न उभे केले जातात. मात्र, १५२६ मध्ये बाबर भारतात आल्यानंतर सुमारे ७५० वर्षे गुलाम होता म्हणजे मेरिट नसल्यामुळेच ना? खाजगी क्षेत्रात आरक्षण नको, असे संविधानाने मुळीच म्हटले नाही. देशाच्या बांधणीसाठी, मागासवर्गीयांच्या उत्थानासाठी जी कोणती सकारात्मक कृती असते ती करण्यासाठी संविधानाचा कधीच नकार नसतो, असे डॉ. मुणगेकर म्हणाले.
त्यांच्या भाषणात त्यांनी भाजपाचे नरेंद्र मोदी, लालकृष्ण आडवाणी, सरसंघचालक मोहन भागवत आदींवर टीका केली. हिंदुत्वाच्या गोष्टी करणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक म्हणून एकाही ब्राम्हणेतराची वर्णी लागली नाही, याकडे अंगुलीनिर्देश करीत असताना हिंदुत्व म्हणजे ब्राम्हणांचे हितसंबंध जपण्याची, त्यांची एकाधिकारशाही कायम टिकवण्याचे आच्छादन असल्याची प्रखर टीका त्यांनी केली. भांडवलशाहीतून या देशाचा, मागासवर्गीयांचा प्रश्न सुटू शकत नाही. देशात ६७ टक्के पदवीधर नोकरी देण्याच्या लायकीचे नाहीत आणि ३७ टक्के अभियंत्यांचीही तीच अवस्था आहे. नक्षलवादाचा जन्म अशाच सुपिक डोक्यातून झाल्याची आठवण त्यांनी याप्रसंगी करून दिली.
डॉ. सुखदेव थोरात यांनी सर्वसमावेशकतेचे धोरण आत्मसात करीत असताना त्यांच्या उन्नतीच्या आड येणारे अडथळे पार पाडण्यासाठी त्यांना मदत करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. डॉ. विलास सपकाळ, पद्मश्री अभियंता मिलिन्द कांबळे यांचीही यावेळी भाषणे झाली. अध्यक्षीय भाषणात प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी संविधान विरोधकांचा समाचार घेतला. प्रा. डॉ. मनीष वानखेडे यांनी संचालन केले. संघटनेचे अध्यक्ष डॉ. प्रदीप हाडके, सरचिटणीस संजोग तुपे, उपमहापौर जेतुन्नबी अशफाक अन्सारी, विधिसभा सदस्य प्रा.डॉ. प्रकाश वनकर व्यासपीठावर होते. डॉ. कृष्णा कांबळे, डॉ. चंद्रशेखर हिवरे, डॉ. जयराम खोब्रागडे, डॉ. दिलीप गोतमारे, डॉ. विजय बोरघाटे, पत्रकार केवल जीवनतारे आणि पत्रकार किशोर बागडे आदींचा सत्कार करण्यात आला.