News Flash

चेंबूरच्या अयोध्यानगर शाळेची दुरवस्था

चेंबूरमधील अयोध्यानगर महानगरपालिकेच्या शाळेची दुरूस्तीअभावी दुरवस्था झाली असून शाळेत अनेक ठिकाणी पडझड झाल्याने विद्यार्थी जीव मुठीत धरूनच वर्गात बसतात.

| August 19, 2015 12:49 pm

चेंबूरमधील अयोध्यानगर महानगरपालिकेच्या शाळेची दुरूस्तीअभावी दुरवस्था झाली असून शाळेत अनेक ठिकाणी पडझड झाल्याने विद्यार्थी जीव मुठीत धरूनच वर्गात बसतात. या भागात ही एकमेव उच्च प्राथमिक शाळा आहे. अयोध्यानगर, म्हाडा कॉलनी, सह्य़ाद्री नगर, कस्तुरबा नगर, भारत नगर या परिसरातून विद्यार्थी या शाळेत शिक्षण्यासाठी येतात. शाळेत मराठी आणि तामिळ माध्यमाचे सुमारे ५५० विद्यार्थी शिकत आहेत. ही शाळा सकाळी व दुपारी अशा दोन सत्रात भरते. तरिही ५५० विद्यार्थ्यांकरिता शाळेत अवघे नऊच वर्ग आहेत. इतक्या विद्यार्थ्यांकरिता हे वर्ग खरेतर अपुरे आहेत. त्यामुळे, केवळ दुरूस्तीच नव्हे तर शाळेचा विस्तार होणे आवश्यक आहे. ८०च्या दशकात बांधण्यात आलेल्या या शाळेची एकदाही डागडुजी करण्यात आलेली नाही. त्यामुळे, शाळेच्या भिंतींना ठिकठिकाणी तडे गेले आहेत. छत तर पावसाळ्यात कायम गळत असते. भितींना पावसाची ओल येत असल्याने सर्वत्र बुरशी जमते. या शिवाय तुटलेले लोखंडी जाळ्या, तडे गेलेल स्लॅब अशी या शाळेची दुरवस्था झाली आहे.या शाळेच्या दुरूस्तीचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. मात्र, त्याला अद्याप मंजुरी न मिळाल्याने दुरूस्तीचे काम रखडले आहे. आता तर शिक्षकही शाळा सोडून जाऊ लागले आहेत, अशी तक्रार सामाजिक कार्यकर्ते शाम सोनार यांनी केली. शाळेच्या दुरूस्तीबाबत पालकांनीही पुढाकार घेऊन पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार केला होता. मात्र, त्याला अद्याप यश आलेले नाही. परिणामी विद्यार्थी जीव मुठीत घेऊनच शाळेत पाय ठेवतात, अशी तक्रार सोनार यांनी केली.शैक्षणिकदृष्टय़ाही ही शाळा दर्जेदार असल्याने सध्यातरी शाळेची पटसंख्या टिकून आहे. परंतु, येथील स्थानिक राजकीय नेत्यांनाही या शाळेची दुरूस्ती होऊ नये असे वाटते. कारण, काहींच्या या भागात शाळा आहेत. शाळा बंद झाली तर येथील विद्यार्थी आपल्या शाळेत येतील, असा या नेत्यांचा होरा आहे. म्हणून शाळेची जाणूनबुजून दुरूस्ती केली जात नसल्याचा आरोप एका शिक्षकाने केला. परंतु, शाळेची अवस्था अशीच राहिली तर मुलांचे पाय बाजूच्या खासगी शाळांकडे वळू लागतील, अशी शक्यता या शिक्षकांनी व्यक्त केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 19, 2015 12:49 pm

Web Title: bad condition of ayodhya nagara chembur school
Next Stories
1 गेल्या काही वर्षांत १४ बलात्कार; ९३ जणांचा बुडून मृत्यू …
2 महापालिकेची ‘समूह सफाई’ची सक्ती
3 आता फलाटावरही उभे राहणे अशक्य
Just Now!
X