शहरातील रस्ते खराब असल्याची ओरड एवढी की, या प्रश्नाकडे कानाडोळा करणाऱ्या महापालिका प्रशासनाला त्याची सवयच झाली आहे! रस्त्यासाठी नाना प्रकारची आंदोलने झाली. पण प्रशासन ढिम्मच. या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी लोक नीती मंचच्या वतीने रिक्षाचालकांवर खड्डय़ांचा झालेला परिणाम तपासण्यासाठी घेण्यात आलेल्या शिबिरात त्यांची हाडे अक्षरश: खिळखिळी झाल्याचे अहवाल डॉक्टरांनी दिले आहेत. मानदुखी, पाठदुखी, खांदेदुखीसह स्पाँडिलायटिससारखे दुखणे कायमचे मागे लागेल, अशी भीती रिक्षाचालकांच्या आरोग्य तपासणीतून पुढे आली आहे.
औरंगाबाद ऑर्थोपेडिक असोसिएशनच्या मदतीने २९ डिसेंबरला शहरातील १५४ रिक्षाचालकांच्या हाडांची ठिसूळता, तसेच ‘दुखण्यां’ची तपासणी करण्यात आली. १५४पैकी ४६जणांना मानदुखीचा आजार जडल्याचे स्पष्ट झाले. २२जणांना पाठदुखी, ४४जणांना कंबरदुखी, तसेच हाडे ठिसूळ होण्याचा आजारही काहींना होता.
असोसिएशनने केलेल्या तपासणीचा अहवाल अध्यक्ष डॉ. संतोष रांजळकर, सचिन फडणीस व प्रकल्पाचे समन्वयक डॉ. मंगेश पानट यांनी तयार केला. अहवालात त्यांनी खराब रस्त्यांमुळे रिक्षाचालकांमागे ‘दुखणी’ लागली असल्याचे म्हटले आहे. खराब रस्ते व रिक्षांना आघात सहन करण्यासाठी आवश्यक असणारी यंत्रणा पुरेशी नाही. त्यामुळे समस्या निर्माण झाल्याचे म्हटले आहे. तपासणीत काही रिक्षाचालकांना एक्स रे काढण्यास सुचविण्यात आले, तर काहींना एमआरआय स्कॅन करण्याचा सल्लाही देण्यात आला. कामाच्या वेळा अनियमित असणे, अधिक काम, झोपेची कमतरता व खराब रस्ते यामुळे या समस्या निर्माण झाल्या आहेत. रस्ते सुधारल्यास त्यांची प्रकृतीही सुधारेल. मात्र, त्यासाठी काही व्यायामाचे प्रकार रिक्षाचालकांना नव्याने करावे लागतील, असा सल्ला डॉ. मंगेश पानट यांनी त्यांच्या अहवालात दिला.
शहरात खराब रस्त्यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या साहित्यिकांवर गुन्हा नोंदविण्यापर्यंत मजल महापालिकेने मारली होती. त्यानंतर खराब रस्त्यांविरोधात काही सजग नागरिकांनी ‘नो-कर आंदोलन’ही सुरू केले. तरीही मनपाने रस्त्यांवरील खड्डय़ांचा प्रश्न गांभीर्याने घेतला नाही. काही ठिकाणी माती टाकून खड्डे बुजविण्याचे थातूर-मातूर उद्योग वगळल्यास रस्त्यासाठी फार काही घडले नाही. परिणामी या सर्व उपक्रम, आंदोलनांची माहिती न्यायालयासमोर सादर करण्याच्या तयारीत काही नागरिक आहेत. लोक नीती मंचच्या वतीने अशा स्वरुपाची जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केली जाईल, असे जनशक्ती वाचक चळवळीचे श्रीकांत उमरीकर यांनी सांगितले.
रिक्षांची दरवाढ २६ पासून
शहरातील रिक्षांच्या दरात वाढ करण्यात आली आहे. पहिल्या किलोमीटरसाठी १३ रुपये, तर त्यानंतर प्रत्येक किलोमीटरसाठी ११ रुपये अशी दरवाढ करण्याचा निर्णय प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत गुरुवारी घेण्यात आला.
शहरातील रिक्षाचालक मीटरप्रमाणे पैसे आकारत नाहीत. त्याला दरवाढ न झाल्याचे कारण पुढे केले जात होते. नव्याने दरवाढ करण्यात आली असून २६ जानेवारीपासून ती लागू होणार आहे. तसेच बसस्थानक व रेल्वे स्टेशनपासून प्रीपेड रिक्षा केंद्रही उभारले जाणार आहे. शहरातील रस्त्यांची दुरवस्था लक्षात घेता ऑटो रिक्षाचालकांना देण्यात आलेला दर परवडणारा नसल्याचे रिक्षाचालक सांगत. त्यामुळे ते म्हणतील ते भाडे ग्राहकांना द्यावे लागते. बहुतांश रिक्षाचालक मीटरप्रमाणे किराया घेण्यास थेट नकारच देतात. रिक्षाचालकांच्या अरेरावीला औरंगाबादकरही वैतागले आहेत. चौका-चौकांत ग्राहक, रिक्षाचालकांची बाचाबाची सुरू असते. यावर उपाय म्हणून दरवाढ करावी व रिक्षाचालकांनाही योग्य न्याय द्यावा, अशी नागरिकांची मागणी होती.
प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत दरवाढीबाबत चर्चा करण्यात आली. पूर्वी पहिल्या किलोमीटरसाठी १२ रुपये दर आकारला जात असे. तो आता १३ रुपये केला आहे. त्यानंतरच्या प्रत्येक किलोमीटरसाठी ९ रुपये असलेला दर ११ रुपयांपर्यंत वाढविला आहे. शहरात सुमारे २० हजार परवानाधारक रिक्षाचालक, तर ७ हजार रिक्षा विनापरवाना आहेत. परवाना नूतनीकरणासाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदत दिली होती. ही आता ३१ जानेवारीपर्यंत वाढविली आहे. शेअर रिक्षाचे दरही ठरविले जाणार आहे. त्यामुळे प्रवाशांचाही त्रास वाचणार आहे.