भावे नाटय़गृहात ‘सावळो गोंधळा’चे प्रयोग..
कोणाचा पायपोस कोणाच्यात नसलेल्या वाशी येथील पालिकेच्या भावे नाटय़गृहात अलीकडे ‘सावळो गोंधळ’, ‘व्याप कोणाचा ताप कुणाला’ असे प्रयोग कलाकाराविना रंगत असल्याची चर्चा सुरू आहे. नाटय़गृहात बुधवारी रात्री उशिरापर्यंत चाललेल्या एका कार्यक्रमात चक्क धिंगाणा घालण्यात आल्याने पोलिसांना पाचारण करून हा राडा तासाभरानंतर शांत करण्यात आला. सतराशे साठ खात्यांची साठवण करणारे पालिकेचे प्रशासकीय उपायुक्त जगन्नाथ सिन्नरकर यांनी तर ‘टेडा है पर मेरा है’ असे म्हणत गेली क्रित्येक वर्षे हे नाटय़गृह स्वत:कडे ठेवले आहे. त्यामुळे तीन महिन्यांपूर्वी भर कार्यक्रमात गायकांच्या अंगावर पावसाच्या पाण्याचा अभिषेक होऊनही या नाटय़गृहाच्या दुरुस्तीकडे गांभीर्याने पाहिले जात नाही.
नवी मुंबईचे सांस्कृतिक व्यासपीठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबई पालिकेच्या वाशी येथील विष्णुदास भावे नाटय़गृहाला सध्या कोणी वाली नाही. सिडकोकडून आयत्या मिळालेल्या या वास्तूची महापालिकेत कुणालाही किंमत नसून त्याकडे लक्ष देण्यासाठी पूर्ण वेळ सक्षम अधिकारी नाही. त्यामुळे हे नाटय़गृह ‘आवो जावो घर तुम्हारा’ या पठडीत मोडणारे आहे. बुधवारी घडलेल्या घटनेमुळे ही बाब अधिक प्रकर्षांने ऐरणीवर आली आहे. ‘यू अ‍ॅण्ड आय एंटरटेन्टमेंट’ नावाच्या संस्थेने या ठिकाणी गाण्याच्या स्पर्धेचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यात एका मुलीला प्रेक्षकांनी वन्समोअर दिला. त्यामुळे ती मुलगी स्पर्धेत पुढे येईल अशी अपेक्षा होती, पण ती नंतर बाहेर फेकली गेली. त्यामुळे बोनकोडे येथील एका ग्रामस्थाने स्टेजवर जाऊन आपला ‘दीप’ लावला आणि चांगलाच धिंगाणा घातला. त्याला आवरायला अनेक जण पुढे आले पण उपयोग झाला नाही, कारण हे महाशय चांगलीच ढोसून आले होते. त्यामुळे त्याचा आवेश जोरात होता. शेवटी रात्री बारा वाजता पोलिसांचा ताफा मागविण्यात आला. तेव्हा कुठे हे प्रकरण शांत झाले. वास्तविक असे कार्यक्रम आयोजित करणाऱ्या आयोजकांनी पोलीस बंदोबस्त घेणे आवश्यक आहे, पण ते पाहण्यास व्यवस्थापनाला वेळ कुठे आहे. हा कार्यक्रम नंतर रात्री एक वाजेपर्यंत सुरू होता. अशा प्रकारे रात्री उशिरापर्यंत अनेक कार्यक्रम चालत असल्याची बाब उघडकीस आली आहे. उशिरापर्यंत चालणाऱ्या कार्यक्रमांना जादा आकार लावण्याची तरतूद आहे, पण ‘तेरी भी चूप मेरी भी चूप’ या कराराने हे नाटय़गृह सध्या चालविले जात आहे. यात फार मोठा अर्थपूर्ण व्यवहार होत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. गाण्याच्या स्पर्धा कार्यक्रमात आयोजकांनी एका मोटारसायकलीची जाहिरात घेतली होती. त्यामुळे त्या शोरुमच्या मोटारसायकल थेट नाटय़गृहात घुसविण्यात आल्या होत्या. तरीही व्यवस्थापन हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेवून होते. त्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तारखांचा प्रचंड घोळ सुरू असून या ठिकाणी कोणाचीही तारीख अ‍ॅडजेस्ट केली जात आहे. यात आता काही पत्रकारही आघाडीवर आहेत. दादागिरी करून तारखा घ्यायच्या आणि त्या सांस्कृतिककार्यक्रम करणाऱ्या संस्थांना विकण्याचा उद्योग या पत्रकारांनी सुरू केला आहे. तिकीट खिडकीच्या खणात तर खोऱ्याने अनेक संस्थांचे लेटरहेड आणि स्ॅटम्प आढळून येतात. दर तीन महिन्यांनी तिकीट वाटप केले जाते, त्या वेळी या संस्थांचा पहिला नंबर लागतो. त्यामुळे अनेक तारखा गायब झाल्याचे दिसून येते. नाईक कुटुंबीयाच्या नावाने तर केव्हाही तारखा घेतल्या जातात. त्यासाठी व्यवस्थापनाला केवळ त्यांना ते मुख्य अतिथी असल्याचे सांगावे लागते. यावर कहर म्हणून प्रशासनाने या ठिकाणी संतोष नाईक नावाचा सहव्यवस्थापकच ठेवला आहे. अशा प्रकारे नाईकांच्या नावाने सध्या चांगभलं सुरू आहे. शंभर रुपयांत निघणाऱ्या करमणूक परवान्यासाठी १५०० रुपये घेतले जातात. छताच्या गळतीचे काम योग्य न करणाऱ्या कंत्राटदाराच्या चुकीमुळे तीन महिन्यांपूर्वी ‘बरसात’मधील गाणे गाणाऱ्या गायकाला ढगफुटी झाल्याचा भास झाला. पावसाने त्या गायकाला अभिषेक घातला. त्यामुळे नंतर शो रद्द करावा लागला. लावण्यांच्या कार्यक्रमात दर्दी चांगलेच झिंगून येत असल्याने ‘टल्लीन झाले सारे’ हा प्रयोग पाहण्यास मिळतो. त्यामुळे शिट्टय़ा, पैसे, टाळ्या आणि ठुमके यांचा तमाशा नाटय़गृहात सुरू असल्याने वेळ कधी संपली हे कोणाच्याच लक्षात येत नाही. येथील ध्वनिव्यवस्थाही सदोष असून ती बदलण्याची गरज आहे, पण त्याकडे लक्ष द्यायला प्रशासनला वेळ नाही. गुंतवणूक आणि चेन मार्केटिंग करणारे तर भावे नाटय़गृह खरेदी केल्यासारखेच वागत असल्याचे अनेकदा दिसून आले आहे. त्यामुळे भावे नाटय़गृहात सध्या मनमानी, सावळो गोंधळ, दादागिरी, व्याप कुणाचा ताप कुणाला, असे प्रयोग कलाकारांशिवाय सुरू आहेत. दरम्यान, तोटय़ात चालणाऱ्या या हत्तीची सेवा करण्यासाठी तो पुन्हा दोन महिने बंद ठेवला जाणार असल्याचे समजते.