शहरातील वाढत्या गुन्हेगारीस पोलीस यंत्रणेला जबाबदार ठरविणारे राजकीय पक्षांचे पदाधिकारी दुसरीकडे वेगवेगळ्या टोळक्यांच्या संपर्कात असल्याची बाब निदर्शनास आल्याच्या पाश्र्वभूमीवर, बुधवारी पोलिसांनी शिवसेनेचे महापालिकेतील विरोधी पक्षनेते सुधाकर बडगुजर, नगरसेवक दत्तात्रय सूर्यवंशी व मनसेचे नगरसेवक बापू सोनवणे यांची चौकशी केली. शिवसेनेचे महानगरप्रमुख अजय बोरस्ते परदेशात असल्याने ते चौकशीसाठी उपस्थित नव्हते. गेल्या काही दिवसात शहरात टोळीयुध्दातून गुंडाची झालेली हत्या, एका व्यावसायिकाचे अपहरण व खंडणीचा प्रकार या गुन्ह्यातील काही संशयितांशी अनेक राजकीय पक्षांचे नेते व पदाधिकाऱ्यांचा संपर्क असल्याचे प्रथमदर्शनी तपासात निष्पन्न झाले आहे. पुढील काळात आणखी काही राजकीय पक्षांचे नेते व पदाधिकारी चौकशीच्या फे ऱ्यात सापडण्याची शक्यता आहे.
राजकीय पक्षांचे पदाधिकारीच वेगवेगळ्या गुन्हेगारी टोळक्यांच्या संपर्कात असल्याची बाब पोलिसांच्या निदर्शनास आली. या संबंधांची अधिक चौकशी करण्यासाठी पोलिसांनी शिवसेनेचे महानगरप्रमुख अजय बोरस्ते यांच्यासह महापालिकेतील शिवसेनेचे विरोधी पक्षनेते सुधाकर बडगुजर व नगरसेवक दत्तात्रय सूर्यवंशी व मनसेचे नगरसेवक बापू सोनवणे यांना नोटीस बजावली होती. शहरातील वाढत्या गुन्हेगारीमागे गुन्हेगारांना मिळणारा राजाश्रय कारक ठरल्याची सार्वत्रिक प्रतिक्रिया आहे. या बाबतीत काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना व मनसे हे सर्वच पक्ष एकाच माळेचे मणी असल्याचे दिसते. मागील आठवडय़ात भीम पगारे या गुंडाची चांगले टोळीने हत्या केली होती. त्या प्रकरणी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपासात गणेश चांगले हा सेनेचे महानगरप्रमुख अजय बोरस्ते यांच्या ऊर्जा व्यायामशाळेत वास्तव्यास होता, असे निष्पन्न झाले. या पाश्र्वभूमीवर, पोलिसांनी बोरस्ते यांना नोटीस बजावली होती. परंतु, ते परदेशात गेल्याचे कुटुंबियांकडून पोलिसांना सांगण्यात आले. यामुळे बुधवारी चौकशीसाठी ते उपस्थित राहिले नाहीत.
भीम पगारेची हत्या होण्यापूर्वी पगारेच्या टोळक्याने एका व्यावसायिकाचे अपहरण केले होते. त्याच्याकडून ७० हजाराची खंडणी घेऊन उर्वरित दोन लाख रुपयांची तातडीने तजविज करण्याची धमकी दिली होती. त्यानंतर पगारेची हत्या झाली. व्यावसायिकाचे अपहरण व खंडणी प्रकरणी मयत पगारेसह १४ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यातील काही संशयितांना पोलिसांनी अटक केली. या प्रकरणातील काही संशयित शिवसेनेचे पालिकेतील विरोधी पक्षनेते सुधाकर बडगुजर व नगरसेवक दत्तात्रय सूर्यवंशी तसेच मनसेचे नगरसेवक बापू सोनवणे यांच्या संपर्कात राहिल्याचा पोलिसांना संशय आहे. या प्रकरणाची अधिक चौकशी करण्यासाठी पोलिसांनी संबंधितांना नोटीस बजावली होती. या पाश्र्वभूमीवर, बडगुजर, सूर्यवंशी व सोनवणे हे सकाळी पोलीस उपायुक्त अविनाश बारगळ यांच्या कार्यालयात हजर झाले.
साधारणत: अर्धा तास प्रत्येकाची स्वतंत्रपणे चौकशी करण्यात आली. संशयितांशी संपर्क येण्याचे कारण व तत्सम बाबींची खातरजमा करण्यात आल्याची माहिती बारगळ यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. अधिक चौकशीसाठी गरज भासल्यास त्यांना परत बोलावले जावू शकते, असेही त्यांनी सांगितले. उपरोक्त संशयित इतर राजकीय पक्षांचे नेते व पदाधिकाऱ्यांच्याही संपर्कात राहिल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे पुढील काळात या स्वरुपाची चौकशी इतर राजकीय पक्ष्यांच्या नेत्यांचीही होवू शकते, असे संकेत बारगळ यांनी दिले.
चौकशी आटोपल्यानंतर बडगुजर, सूर्यवंशी व सोनवणे यांनी पत्रकारांशी बोलताना चौकशीसाठी पोलिसांना मदत करण्यास आम्ही कधीही तयार असल्याचे सांगितले. यापुढेही पोलिसांनी बोलाविल्यास आम्ही सहकार्य करू असे सांगितले.